

राधिका वळसे-पाटील ः सकाळ वृत्तसेवा
जयपूर, ता. ८ : रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत जयपूरच्या उपनगरीय विभागात गांधीनगर रेल्वे स्थानकाचे आंतरराष्ट्रीय सुविधांसह पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या स्थानकाचे सर्व व्यवस्थापन केवळ महिलांच्या हाती असणार आहे. हा प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. स्थानकाचे मुख्य आणि द्वितीय प्रवेशद्वारांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या त्यावर अंतिम काम सुरू आहे. ७२ मीटर रुंदीचा ‘एअर कॉन्कोर्स’ हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असेल. गांधीनगर जयपूर स्थानकावर दोन नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ चार हजार ५१६ चौरस मीटर क्षेत्रफळात तळमजला आणि त्यावर दोन मजली इमारत बांधली गेली आहे. या इमारतीत आगमन-प्रस्थान लॉबी, सुरक्षा तपासणीसाठी बॅगेज स्कॅनर असलेला विभाग, हेल्प डेस्क, प्रस्थान हॉल, स्वच्छतागृहे, आरपीएफ कक्ष आणि मुख्य टीसी कक्ष यांचा समावेश आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अनारक्षित प्रतीक्षालय, कार्यकारी प्रतीक्षालय आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानकावर आठ लिफ्ट आणि चार एस्केलेटर बसवले जात आहेत तसेच दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वारावर तीन हजार २९ चौरस मीटर क्षेत्रात तळमजला आणि त्यावर दोन मजली इमारत बांधली गेली आहे. या इमारतीत तिकीट काउंटर, बुकिंग कार्यालय, सुरक्षा तपासणी विभाग, प्रस्थान हॉल आदींचा समावेश आहे. सात हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात दोन मजली बेसमेंट पार्किंग बांधण्यात आले असून, येथे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानक परिसरात सहा हजार चौरस मीटर क्षेत्रात प्लॅटफॉर्म शेल्टर, तसेच ५ विश्रांतीगृह आणि मुक्कामासाठी सामूहिक विश्रांतीगृह (डॉरमेट्री) बांधण्यात आल्या आहेत.
एअर कॉन्कोर्स तयार ः
स्थानकावरील दोन्ही इमारतींना जोडणारा ७२ मीटर रुंद आणि दोन हजार ७०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक बंद पण हवेशीर मार्ग (एअर कॉन्कोर्स) तयार करण्यात आला आहे. या एअर कॉन्कोर्समध्ये प्रवाशांसाठी वेटिंग रूम, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कॅफेटेरिया, गेम झोन यांसारख्या सुविधा असतील. दोन हजार २०० चौरस मीटर क्षेत्र व्यावसायिक उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. हा विभाग प्रवाशांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुला राहील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
पुनर्विकास ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर ः
स्थानकाचा पुनर्विकास ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर आधारित आहे. पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. स्थानकावर एक हजार ३७६ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने हा पुनर्विकास प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.