प्रभाग आरक्षणाची आज निघणार सोडत

प्रभाग आरक्षणाची आज निघणार सोडत

Published on

पुणे, ता. १० : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमधील आरक्षण निश्‍चित करण्यासाठी उद्या (ता. ११) गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ११ वाजता सोडत निघणार आहे.
महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी तयारी करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष प्रभाग रचनेनंतर आरक्षणाच्या सोडतीकडे लागले होते. सोडत निघण्यास उशीर झाल्याने अनेकांनी त्यांच्या प्रचारासाठीचे कार्यक्रम लांबणीवर टाकले होते; पण आता मंगळवारी आरक्षणाची सोडत निघणार आहे. यात ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षित प्रभाग निश्‍चित केले जाणार आहेत.
१६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा म्हणजे ८३ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी २२, अनुसूचित जमातींसाठी दोन जागा आरक्षित आहेत. ओबीसीसाठी ४४ जागा राखीव आहेत. सोडत निघाल्यानंतर हे आरक्षित प्रभाग कोणते हे निश्‍चित होईल. सोडत काढल्यानंतर आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाईल. या प्रारूप आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. या हरकती, सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

Marathi News Esakal
www.esakal.com