स्वच्छ संस्था-महापालिका आमनेसामने

स्वच्छ संस्था-महापालिका आमनेसामने

Published on

पुणे, ता. ११ ः पुणे महापालिकेने ढकल गाड्यातून कचरा गोळा करण्याऐवजी थेट मोठ्या गाड्या फिरवल्या जात आहेत. यास स्वच्छ संस्थेचा विरोध आहे. आता महापालिकेच्या गाड्यांना कचरा संकलनासाठी प्रचंड उशीर होत आहे, तसेच कचरावेचक महिलांना दुपारी अडीच-तीनपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. शहरातील एक हजार ७६ संकलन केंद्रांवर ३२ टक्के ठिकाणी गाड्या उशिरा येत आहेत, असा आरोप होत आहे. मात्र, प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत महापालिकेच्या धोरणाला विरोध करण्यासाठी हा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण केला जात आहे, असे स्पष्ट केले आहे.
स्वच्छ संस्थेने पत्रकारांना पाठवलेल्या निवेदनात कचरावेचक महिलांचे अनुभव दिले आहेत. सारिका उकिर्डे यांना सकाळी सात वाजता कचरा गोळा करायला यावे लागते. पण काम संपल्यावर महापालिकेची गाडी लवकर येत नसल्याने काम संपल्यावर पुन्हा सात तासांनी राजाराम पुलावर जावे लागले. इथे घाण झाली तर त्याचा दोष आम्हाला दिला जातो, असे त्यांनी सांगितले आहे.
‘‘माझं काम सकाळी सहा वाजता सुरू होतं आणि दहा वाजता संपतं. पण ओला कचऱ्याची गाडी दुपारी तीन-चार वाजता येते. तोपर्यंत आम्हाला फीडरवरच थांबावं लागतं. जेवण नाही, विश्रांती नाही, फीडरजवळ स्वच्छतागृह नसल्याने कुचंबणा होते,’’ असे शिवाजीनगरमध्ये काम करणाऱ्या सिंधू हणवटे यांनी सांगितले. यासह अन्य काही कचरावेचक महिलांचे अनुभव या निवेदनात दिले आहेत. स्वच्छकडून संकलित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यांत शहरातील एक हजार ७६ फीडर पॉइंटपैकी ३२ टक्के ठिकाणी गाड्या उशिरा आल्या, तर ६ टक्के ठिकाणी गाड्या आल्याच नाहीत. गाड्या उशिरा येण्यामुळे शहरात ४०० हून अधिक ठिकाणी कचरा रस्त्यावर साचून राहत आहे, हस्तांतर केंद्रावर भरपूर ताण आहे, या केंद्रांची क्षमता अपुरी पडत आहे.
याबाबत स्वच्छ संस्थेच्या लुब्रा अनंतकृष्णन म्हणाल्या, ‘‘विमाननगर परिसरात महापालिकेने ‘विश्वास २०२५’ नावाचा प्रायोगिक तत्त्वावरचा प्रकल्प सुरू केला. त्यात कचरावेचकांऐवजी गाड्यांद्वारे थेट संकलन सुरू केले आहे. शहरातील कचरा हाताळणीची क्षमता वाढवली नाही, तर शहरात यांत्रिक पद्धतीने कचरा संकलन राबविणे अशक्य आहे. प्रक्रिया केंद्रांची क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. या नव्या प्रणालीतील त्रुटी आहेत, यापुढे नागरिकांनाही हे लक्षात येईल.
वाहतूक कोंडी, गाडी खराब होणे यामुळे कचरा संकलनास काही प्रमाणात उशीर होत आहे. पण सर्व ठिकाणचा कचरा उचलला जातो. अशी प्रकारे माहिती देऊन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. महापालिकेने विमाननगरमध्ये कचरा संकलनासाठी गाड्यांचा वापर सुरू केला. त्यात कचरावेचकांनाही सामावून घेतले आहे. पण या नव्या प्रयोगाला ठरावीक लोकांचाच विरोध आहे. महापालिका कचरा व्यवस्थापनात कायम सुधारणा करत आहेत. गाड्या वेळेवर जाण्यात यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, जर ३२ टक्के ठिकाणी गाड्या उशिरा गेल्या असत्या तर सर्वत्र कचरा दिसला असता. त्यामुळे ‘स्वच्छ’च्या दाव्यात तथ्य नाही.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

‘त्या महिलेची तक्रार नाही’
‘स्वच्छ’च्या कचरावेचक सारिका उकिर्डे यांना राजाराम पूल येथील फीडर पॉइंटवर संध्याकाळी यावे लागते असे सांगितले जात आहे. पण आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बोललो तेव्हा त्यांचा फीडर पॉइंट राजाराम पूल नाही हे समोर आले. तसेच त्यांच्याकडे कचरा संकलनासाठी गाडी वेळेवर येत असल्याचे त्यांनी सांगितले, असे कदम यांनी सांगितले.

या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असा होतो उशीर
क्षेत्रीय कार्यालय - गाड्या उशिराने येण्याचे प्रमाण - गाड्यांची गैरहजेरी
कोथरूड-बावधन - ४७ टक्के - ३ टक्के
वारजे-कार्वेनगर - ४१ टक्के - ११ टक्के
कोंढवा-येवलेवाडी - ४२ टक्के - ५ टक्के
औंध-बाणेर - ३८ टक्के - १२ टक्के
नगर रस्ता-वडगाव शेरी- २६ टक्के - ११ टक्‍के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com