कापडी कचरा ठरतोय पर्यावरणीय संकट

कापडी कचरा ठरतोय पर्यावरणीय संकट

Published on

पुणे, ता. ११ : आजच्या ‘वापरा आणि फेका’ संस्कृतीतून उगम पावलेली ‘जलद फॅशन’ आता पर्यावरणासाठी गंभीर संकट ठरत आहे. जगभरात दरवर्षी तब्बल ९२ दशलक्ष मेट्रिक टन वस्त्रकचरा निर्माण होत असताना, पुण्यासारख्या शहरातही कापडी कचऱ्याचा डोंगर वाढत आहे. शहरातील सुक्या कचऱ्यापैकी साधारण ७५ मेट्रिक टन कचरा हा केवळ कपड्यांचा असतो. त्यामुळे ‘फॅशन’ जरी जलद झाली असली, तरी तिचा पर्यावरणीय खर्च झपाट्याने वाढला असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वस्त्रकचरा प्रामुख्याने तीन प्रकारांत विभागला जातो. उत्पादन प्रक्रियेतून, वापरलेले कपडे फेकल्याने, तसेच मोठ्या उत्पादन यंत्रणांमधून होणारा औद्योगिक कचरा. या कचऱ्यात नैसर्गिक तंतूंसोबत पॉलिस्टरसारखे कृत्रिम तंतू असतात. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, फॅशन उद्योग जगातील एकूण कार्बन उत्सर्जनाच्या १० टक्क्यांकरिता जबाबदार आहे, तर दरवर्षी ५ लाख मेट्रिक टन मायक्रो फायबर समुद्रात मिसळले जाते. २००० ते २०१५ दरम्यान कपड्यांचे उत्पादन दुप्पट झाले, मात्र कपडे वापरण्याचा कालावधी तब्बल ३६ टक्क्यांनी कमी झाला आहे. या अशाश्‍वत फॅशनमुळे हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण या तिहेरी संकटाची तीव्रता वाढली आहे.
भारत हा जगातील एक मोठा कापड उत्पादक देश असल्याने येथे वस्त्रकचरा ही गंभीर समस्या बनली आहे. पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालानुसार, शहरातून दररोज सुमारे १ हजार ४०० मेट्रिक टन कोरडा कचरा निर्माण होतो, त्यापैकी ७५ मेट्रिक टन कापडी कचरा असतो. प्रत्येक प्रकारच्या वस्त्र कचऱ्यासाठी पुनर्वापराचे वेगवेगळे तंत्रज्ञान आवश्यक असते. त्यामुळे पुणे महापालिकेकडून स्वतंत्र वस्त्रकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
---------------
‘पूर्णम’चा सर्जनशील प्रयोग
या समस्येवर उपाय म्हणून शहरातील ‘पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन’ संस्थेने ‘फॅब्रिक अपसायकलिंग’चा अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. २०२४ मध्ये त्यांनी १८ हजार किलो कापड कचरा गोळा केला. त्यापैकी १२ हजार किलो कपडे दान केले, तर उर्वरित कापडांपासून ट्रेंडी बॅग, पर्स, पाऊच तयार केले. या उपक्रमातून १०० हून अधिक महिलांना रोजगारदेखील मिळाला आहे.
-------------------
आजचे जग ‘वापरा आणि फेका’ संस्कृतीचे झाले आहे. कपडे काही वेळा वापरले की जुने वाटतात आणि नवीन घेतले जातात, त्यामुळे कपड्यांचा कचरा वाढतोय. ही समस्या कमी करण्यासाठी ‘३ आर’ ‘रिड्यूस, रियूज आणि रिसायकल’ या तत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. जुन्या कपड्यांपासून नवीन उत्पादने तयार करून त्यांचा वापर करणे हे पर्यावरणपूरक आणि काळाची गरज आहे.
- श्‍वेता पटवर्धन, सल्लागार समिती सदस्य, पूर्णम् इको व्हिजन फाउंडेशन
---------------------
पुण्यात दररोज सुमारे ७५ मेट्रिक टन कापडी आणि फर्निचर कचरा तयार होतो. या वाढत्या वस्त्रकचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत हे केंद्र कार्यान्वित होईल.
- संदीप कदम, घनकचरा विभागप्रमुख, पुणे महापालिका
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com