पुणे-पिंपरीत प्रभाग आरक्षण निश्‍चित

पुणे-पिंपरीत प्रभाग आरक्षण निश्‍चित

Published on

पुणे, ता. ११ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागांमध्ये मंगळवारी आरक्षण निश्‍चि‍त करण्यात आले. काही प्रभागांत अनुसूचित जाती, महिलांचे आरक्षण पडल्याने अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. त्यांना दुसऱ्या प्रभागांत जागा शोधावी लागणार आहे.
पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आरक्षण जाहीर करण्यात आले. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पुण्यात ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २२ जागा असून, त्यापैकी ११ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा असून, त्यातील एक महिलेसाठी आरक्षित आहे. ओबीसी प्रवर्गासाठी ४४ जागा असून, त्यापैकी २२ ठिकाणी महिलांसाठी आरक्षण आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९७ जागा असून, त्यातील ४९ ठिकाणी महिलांचे आरक्षण आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी सोडत काढली. यात अनुसूचित जाती संवर्गातील २० पैकी १०, अनुसूचित जमाती संवर्गातील तीनपैकी दोन, ओबीसी संवर्गातील ३४ पैकी १७ आणि सर्वसाधारण गटातील (खुला) ७१ पैकी ३५ अशा ६४ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांच्या संभाव्य प्रभागातील जागा त्या-त्या संवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी केलेल्या पुरुषांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची स्थिती आहे. साधारण १० प्रभागांमध्ये २० माजी नगरसेवकांना तडजोड करावी लागणार असून, स्वतःऐवजी घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

नेत्यांच्या जागी कोण?
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे व चेतन तुपे हे चार आमदार २०१७ च्या महापालिका निवडणुकीत महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. २०२५ मध्ये निवडणूक होत असताना या नेत्यांच्या जागी कार्यकर्त्यांना संधी मिळणार की त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागले आहे.

सर्वात मोठ्या प्रभागात महिलाराज
पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८ हा एकमेव पाच सदस्यांचा आहे. या ठिकाणी तीन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. हा प्रभाग एक लाख २३ हजार लोकसंख्येचा आहे. या ठिकाणी मतदारांची संख्या दोन लाखांच्या जवळपास जाणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रभागावर महिलाराज असणार आहे. तर दोन जागा पुरुष उमेदवारांना आहेत. या ठिकाणी सर्वच उमेदवार मातब्बर असून, त्यांना एकमेकांच्या विरोधात लढताना जिंकून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

मित्र झाले प्रतिस्पर्धी
एकाच पक्षात काम करताना कार्यकर्ते एकमेकांचे चांगले मित्र असतात. पक्षाच्या कार्यक्रमात ते एकत्र असतात, पण आरक्षण पडल्यानंतर दोघांसाठी एकच जागा उपलब्ध असते, अशा वेळी या मित्रांना उमेदवारी मिळविण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करावी लागणार आहे. ही स्थिती पुण्यातील प्रभाग क्रमांक आठ औंध-बोपोडी, प्रभाग १२ शिवाजीनगर- मॉडेल कॉलनी, प्रभाग २९ डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी, प्रभाग ३१ मयूर कॉलनी- कोथरूड, प्रभाग २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई, प्रभाग २६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ- समता भूमीत, प्रभाग २१ मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क यांसह अन्य ठिकाणी आहे. त्यामुळे उमेदवारी कोणता मित्र मिळविणार? याकडे लक्ष लागले आहे.

तगड्या उमेदवारांना ऐनवेळी संधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून अनेक जण निवडणुकीची तयारी करत आहेत. आरक्षण निश्‍चित न झाल्याने अनेकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रत्यक्ष तयारीला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी पुरुषांना निवडणूक लढविणे शक्य नाही, तेथे ते घरातील महिलेला निवडणूक
लढविण्यास सांगू शकतात. कमकुवत उमेदवार असले तर दुसऱ्या पक्षातील तगड्या उमेदवारांनाही ऐनवेळी संधी मिळू शकते. त्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com