दत्तक संकल्पना ः परंपरेपासून कायद्यापर्यंतचा प्रवास
‘दत्तक’ ही संकल्पना खूप प्राचीन आहे. काळानुसार त्याचे स्वरूप बदलत गेले. नवीन नियम, कायदे लागू झाले. दत्तक प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबींचे महत्त्व लोकांना पटू लागले. या प्रक्रियेचे फायदेही अधोरेखित होऊ लागले. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत अनेक गैरसमज असतात, लोक विनाकारण अफवा पसरवतात, चुकीची माहिती देतात. दत्तक प्रक्रियासुद्धा याला अपवाद नाही आणि म्हणूनच सध्याच्या दत्तकत्वाचा प्रवास कसा आहे, याची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- सगुणा फरांदे, कार्यक्रम संचालक, भारतीय समाज सेवा केंद्र, पुणे
----------
या प्रक्रियेतून जाणाऱ्या व त्यात उतरू पाहणाऱ्या दत्तकेच्छु पालकांना काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांचा दत्तकाचा प्रवास सुकर होईल. हा प्रवास बालकांपासून सुरू होतो त्यामुळे बालके संस्थेत दाखल होण्याची प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके दत्तक संस्थेमध्ये बाल कल्याण समितीच्या आदेशाने दाखल होतात. कुमारी माता, विधवा, परितक्त्या महिला या सामाजिक कारणांमुळे स्वतःच्या बाळाची काळजी जबाबदारी घेऊ शकत नाहीत. म्हणूनच त्या संस्थेच्या मदतीने बालकाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतात. ज्यावेळी जन्मदाते बाळाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत किंवा मिळून येत नाहीत त्यावेळी बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने दत्तकासाठी मुक्त घोषित केले जाते व नंतर दत्तकामार्फत पुनर्वसन होऊ शकते.
दत्तक प्रक्रियेची सध्याची परिस्थिती नियम समजून घेणे आवश्यक आहे. Central Adoption Resource Authority यांच्या व मार्गदर्शक तत्त्वानुसार व बाल न्याय कायदा मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१६ व २०२१ नुसार दत्तकाचे कामकाज चालते. प्रत्येक दत्तकेच्छु पालकांना ‘मिशन वात्सल्य’ या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्याचबरोबर आवश्यक असणारे कागदपत्रे जोडावी लागतात. उदा: पॅनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आरोग्याचा दाखला, रहिवासी दाखला इत्यादी. नाव नोंदणी झाल्यानंतर पालक प्रतिक्षायादीमध्ये येतात. सध्याचा प्रतिक्षाकाळ हा ३५ वर्षे आहे. दत्तकेच्छु पालकांची संख्या सध्या अंदाजे ३५,००० आहे व दत्तकासाठी अंदाजे २००० इतकी बालके उपलब्ध आहे.
नोव्हेंबर हा ‘राष्ट्रीय दत्तक जाणीव व जागरूकता’ महिना म्हणून साजरा केला जातो, यावर्षीचे घोषवाक्य # Every Child Matters असे आहे. प्रतीक्षाकाळामध्ये पालकांनी निवड केलेल्या विशेष दत्तक संस्थेकडून गृहभेट अहवाल तयार केला जातो. यामध्ये पालक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची पाहणी केली जाते, तसेच दत्तक पालकांबरोबर स्वतंत्रपणे व नंतर एकत्र चर्चा केली जाते. ज्यामध्ये विविध बाबींचा समावेश असतो. उदाहरणार्थ : बालकाला दत्तकाविषयी कसे व का सांगावे, मुलांना लावली जाणारी शिस्त, दत्तकाविषयी बोलताना वापरली जाणारी भाषा इत्यादी.
कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे बाळ दत्तक घेणाऱ्या जोडप्यांसाठी, एकल पालकांसाठी भारतीय समाजसेवा केंद्र या संस्थेमार्फत कार्यशाळा घेतल्या जातात. ज्यामध्ये बालरोगतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आनुवंशिकता याविषयी माहिती देणारे डॉक्टर, दत्तक पालक व मुले यांचा सहभाग असतो. दत्तक पालकांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांना येथे मिळतात. दत्तकाविषयी माहिती देणारी विविध पुस्तके तिथे पाहायला मिळतात. संस्थेमार्फत आजपर्यंत ४९५१ बालके दत्तक कुटुंबाकडे सोपवली गेली.
वय वर्ष ६ व ते १८ या वयोगटातील बालकांचे ही दत्तकामार्फत पुनर्वसन व्हावे, यासाठी महिला व बालकल्याण विभाग प्रयत्नशील आहे. दत्तकेच्छु पालकांनी नोंदणीकृत संस्थेमार्फत दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजे दत्तकाचा प्रवास सुकर व आनंददायी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

