बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता

बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता

Published on

पुणे, ता. १७ : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची अखेर मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात जुन्नर विभागात सुमारे ११५ बिबट्यांचे प्रायोगिक तत्त्वावर निर्बीजीकरण करण्यात येणार असून, हा देशातील पहिला प्रयोग ठरणार आहे.
पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी नाईक यांनी सोमवारी पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर वन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाईक म्हणाले, ‘‘बिबट्यांची संख्या वाढण्याचा वेग थांबवण्यासाठी निर्बीजीकरण प्रयोग आवश्यक आहे. पुढील सहा महिन्यांत हा प्रयोग किती परिणामकारक ठरतो, याचा अभ्यास करून पुढील धोरण ठरवले जाईल. गेल्या काही वर्षांत जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील काही भागांत पाण्याची उपलब्धता वाढल्याने ऊस लागवड प्रचंड वाढली. त्यामुळे जंगलासारखे वातावरण तयार होऊन बिबट्यांना प्रजननासाठी सुरक्षित जागा मिळाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे वनविभागाचे निरीक्षण आहे. ऊसतोडीचा हंगाम आणि बिबट्यांचा प्रजनन काळ एकाचवेळी येत असल्याने मानवी संपर्क वाढतो आणि हल्ल्यांची संख्या वाढते. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी असलेले २०० पिंजरे अपुरे पडत असल्याने त्यांची संख्या एक हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’

वनमंत्री म्हणाले...
- जंगलातील लहान प्राण्यांची संख्या घटल्याने बिबट्यांना नैसर्गिक खाद्य मिळत नाही आणि ते मानवी वस्तीकडे वळतात. म्हणूनच जंगल परिसरात बिबट्यांच्या खाद्यासाठी काही शेळ्या सोडणार
- वन्य जीवसाखळी पुन्हा संतुलित करण्यासाठी प्रयत्न वाढवले जातील
- बिबट्यांच्या हालचाली ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे बसविण्यात येणार
- बिबट्या गावांच्या हद्दीत आला की तातडीचा सायरन अलर्ट दिला जाईल
- पुणे जिल्ह्यातील या संपूर्ण यंत्रणेसाठी ११ कोटींची तरतूद
- अशीच प्रणाली अहिल्यानगर आणि नाशिकमध्येही राबविण्याची तयारी
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष दक्षता घेतली जाणार

बिबटे स्थलांतरित करणार...
भारताने जसा चित्त्यांचा पुनर्वसन प्रकल्प राबविला, त्याच धर्तीवर काही आफ्रिकन देशांनी भारताकडून बिबट्यांची मागणी केली आहे. या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे. तसेच ‘वनतारा’ प्रकल्पामध्ये काही बिबट्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील १० ते १२ दिवसांत काही बिबटे तिथे स्थलांतरित केले जाणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

बांबूभिंत उभारणार...
ताडोबा अभयारण्यात बफर क्षेत्राभोवती ५०० फूट लांबीची बांबूची भिंत उभारण्यात आली आहे. याच प्रकल्पावर आधारित आता पुणे आणि जुन्नर विभागातही अशीच बांबूची भिंत उभारण्याची योजना आहे. या बांबूची दर तीन वर्षांनी नियोजनबद्ध कापणी केली जाईल, ज्यामुळे तो प्रकल्प दीर्घकाल टिकेल. तसेच सध्या अनेक भागांत वनक्षेत्राची व्याप्ती कमी होत असल्याने ते वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात वनक्षेत्र केवळ नऊ टक्के असल्याने ते वाढवण्यासाठी स्वतंत्र योजना आखण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com