विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत ‘स्पुक्टो’चे आंदोलन
पुणे, ता. १७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार, पाच वर्षांची मुदत पूर्ण केलेल्या प्राध्यापकांना वीस वर्षे किंवा सेवा निवृत्तीपर्यंतचे सेवा सातत्य देणे, यांसह अन्य मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने (स्पुक्टो) सोमवारपासून विद्यापीठात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. पी. के. वाळुंज आणि सरचिटणीस प्रा. प्रवीण ताटे-देशमुख यांनी दिली. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये अनेक नवीन विषय सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी विद्यापीठाने नियमित वेतनश्रेणीवर विद्यापीठ निधीतून प्राध्यापकांच्या नेमणुका केलेल्या आहेत. या प्राध्यापकांना सुरुवातीला पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वीस वर्षे अथवा सेवा निवृत्तीपर्यंत सेवा सातत्य देण्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया होणे अपेक्षित असताना, प्रशासनाकडून विविध अडथळे निर्माण केले जात आहेत. यामुळे प्राध्यापकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तसेच नियुक्तीपासून प्राध्यापकांना लागू असलेला अंशदायी भविष्य निर्वाह निधी विद्यापीठाने अलीकडेच बदलला असल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे. विद्यापीठ प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या कुलगुरू यांच्यापर्यंत पोचविण्यात येतील, असे आश्वासन डॉ. भाकरे यांनी दिले.
‘स्पुक्टो’च्या प्रमुख मागण्या
- व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार पाच वर्षांची मुदत पूर्ण केलेल्या प्राध्यापकांना वीस वर्षे किंवा सेवा निवृत्तीपर्यंतचे सेवा सातत्य देणे
- अंशदायी भविष्य निर्वाह निधीबाबत अन्यायकारक केलेला बदल रद्द करावा

