मटका, गुटखा, अमली पदार्थांचे जाळे सक्रिय

मटका, गुटखा, अमली पदार्थांचे जाळे सक्रिय

Published on

पुणे, ता. १७ : शहरात पुन्हा अवैध धंद्यांचे जाळे सक्रिय होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मटका, प्रतिबंधित गुटखा तसेच ‘एमडी’सारख्या घातक अमली पदार्थांचा पुरवठा वाढत असून, पोलिसांनी अलीकडे केलेल्या कारवायांत ही बाब समोर आली आहे.
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सुमारे १२ लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या भागात अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून, विभागीय चौकशी करण्यात येत आहे. बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रस्ता परिसरात मटका, गुटखा आणि अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार छापा टाकून आरोपी शरणप्पा कट्टीमनी याच्या ताब्यातून ५९ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. या घटनेवरून शहराच्या मध्यवस्तीत पुन्हा अमली पदार्थांचे ‘नेटवर्क’ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वारंवार कठोर सूचना दिल्या असतानाही मटका आणि ड्रग्ज विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.

मटका, जुगार रॅकेटवर कारवाई
शहरातील वाढत्या मटका जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी अलीकडे मोठी मोहीम राबवली. मटका रॅकेटशी संबंधित नंदकुमार नाईकला एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक कारवाई) कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. दरम्यान, आयपीएल सीझनदरम्यान वाढलेल्या ऑनलाइन क्रिकेट बेटिंगच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुटखा विक्री, हुक्का पार्लरमध्ये वाढ
शहरातील अनेक भागांत प्रतिबंधित गुटखा खुलेपणाने विकला जात आहे. त्यामागे खास ‘नेटवर्क’ सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर काही हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लरही चालविली जात असल्याचे समोर आले आहे. अशा ठिकाणांवर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com