पुणेकरांनी अनुभवला ढोल-ताशांचा महाजलसा

पुणेकरांनी अनुभवला ढोल-ताशांचा महाजलसा

Published on

पुणे, ता. १८ : एका लयीत पडणारे ढोलाचे ठेके, त्याला समर्पक अशी ताशाच्या काड्यांची साथ, ढोल-ताशांच्या ठेक्यांची ऊर्जा द्विगुणित करणारे झांजवादन आणि एकाच वेळेला ढोल-ताशांच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने थिरकणारे पन्नासहून अधिक भगवे ध्वज, ढोल-ताशा वादनाचा अनोखा सोहळा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. पुण्यातील सर्व नामवंत पथकांमधील नामवंत वादकांनी एकत्र येऊन सादर केलेला हा ‘कल्लोळ’ अनेकांच्या मनात घर करून गेला.
निमित्त होते, शिवमुद्रा ढोल-ताशा पथकातर्फे आयोजित ‘कल्लोळ’ या सामूहिक वादन सोहळ्याचे. स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पुण्यातील ६५ नामवंत पथकांमधील दिग्गज कलावंत सहभागी झाले होते. त्यांनी एकत्र येत पारंपरिक वादनासह काही उडत्या चालींचे ठेके वाजवत ढोल-ताशा प्रेमींची भरभरून दाद मिळवली. दैनिक ‘सकाळ’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. कार्यक्रमात सुमारे १४० ढोलवादक, १२० हून अधिक ताशावादक, ५० झांजवादक आणि ५० हून अधिक ध्वजधारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन रोडगे, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, अखिल मंडई मंडळाचे विकी खन्ना, जिलब्या मारुती मंडळाचे विश्वस्त भूषण पंड्या, ढोल-ताशा महासंघाचे शिरीष थिटे, ओंकार काढोलकर, केतन देशपांडे, हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक कृष्णा भिलारे, शिवमुद्रा पथकाचे अध्यक्ष आशुतोष देशपांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात पुण्यातील सर्वच नामवंत पथकांसह सुरत, मुंबईमधील काही पथकांच्या वादकांनीही सहभाग घेतला. प्रत्येक पथकातून दोन ढोलवादक, एक ताशावादक आणि एक ध्वजधारी सहभागी झाले होते. वादनादरम्यान पुणेकर ढोलच्या प्रत्येक ठोक्यागणिक एक वेगळी ऊर्जा अनुभवत होते. ‘कल्लोळ’ हा कार्यक्रम पुण्यातील सर्व ढोल-ताशावादक, ढोलप्रेमींना एकत्र आणणारा असून, तो दरवर्षी आणखी मोठा होत राहावा, अशा शुभेच्छा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी दिल्या. मानाच्या गणपती मंडळांतर्फे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘ढोल-ताशासारखी पारंपरिक वाद्यांचा वापर मिरवणुकीमध्ये वाढवायला हवा. शिवमुद्रा पथक दरवर्षी वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून वादनात नावीन्य आणत आहे. त्यांचा ‘कल्लोळ’ हा कार्यक्रम पथकांना जोडून ठेवणारा आहे. प्रास्ताविकात आशुतोष देशपांडे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव काळात आपापल्या मिरवणुकांमध्ये व्यस्त असलेले वादक मिरवणुकीपूर्वी एकत्र यावेत आणि त्यांनी हे वादन करावे, या हेतूने त्याची सुरुवात झाली. पुढील वर्षी या कार्यक्रमाला आणखी मोठे स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com