शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पावणेपाच लाख अर्ज
पुणे, ता. १८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यात येत्या रविवारी (ता. २३) ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून चार लाख ७५ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील दोन लाख २८ हजार २०० विद्यार्थी ‘टीईटी’चे दोन्ही पेपर देणार आहेत.
परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ परीक्षेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर एक) आणि इयत्ता सहावी ते आठवी (पेपर दोन) असे दोन पेपर घेतले जातात. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. आता तर, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आस्थापनांतील कार्यरत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठीदेखील ‘टीईटी’ परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार पाच वर्षे सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षेतून वगळले आहे. त्याव्यतिरिक्त सर्व शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य असणार आहे. राज्यभरातील शिक्षक संघटनांकडून या परीक्षेला विरोध होत असला तरीही, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ‘टीईटी’ परीक्षेसाठी आलेल्या अर्जांची संख्या तुलनेने वाढली आहे.
ही परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती आणि सिंधी अशा नऊ माध्यमांत घेतली जाते. यात ‘पेपर एक’साठी ८९ हजार २३३ विद्यार्थ्यांनी, तर ‘पेपर दोन’साठी एक लाख ५८ हजार २३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेत दोन लाख २८ हजार २०० विद्यार्थ्यांनी दोन्ही पेपरसाठी अर्ज केला आहे. ही परीक्षा राज्यातील एक हजार ४२३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.
माध्यमनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
मराठी : ३,२७,१३५
इंग्रजी : २८,४३७
उर्दू : २५,९३४
हिंदी : ९२,४२०
बंगाली : १६८
कन्नड : १,४६८
तेलगू : ३०
गुजराती : ७५
सिंधी : ०१
एकूण : ४,७५,६६८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

