पुण्यातील वाहतुकीसाठी उपग्रहाची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती ः प्रणाली ५०३ चौकात उभारणार
पुणे, ता. ८ : ‘‘पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. तो सोडविण्यासाठी पुण्यात उपग्रहाचा उपयोग करून ‘अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली’ (कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट मॅनेजमेंट सिस्टिम) ५०३ चौकांत उभारण्यात येणार आहे. त्यातून वाहतुकीचा कमी झालेला वेग वाढविण्यावर भर देण्यात येईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
ते म्हणाले, ‘‘ही प्रणाली आधुनिक प्रकारचा तांत्रिक हस्तक्षेप करून तयार केली आहे. ज्यामध्ये पूर्ण वाहतुकीचा कृत्रिम प्रयोग हा उपग्रहाच्या साहाय्याने करून वाहनांचा वेग वाढविण्यात येईल. कारण पुण्यात वाहनांची संख्या वाढल्याने वेगही कमी झाला असून, तो वाढविण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरेल. यामध्ये सर्व वाहतूक सिग्नलचे दिवे एकात्म पद्धतीने कार्य करतील. या प्रणालीमध्ये कोणत्या रस्त्यावर वाहतूक जास्त आहे, कोणत्या रस्त्यावर वाहतूक कमी आहे, याचा अंदाज घेऊनच सिग्नलवरील वाहतूक दिवे त्यानुसार चालतील. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढेल.’’
या प्रणालीबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले, ‘‘एखाद्या रस्त्यावर जास्त वाहने असतील व त्याला पर्यायी रस्ता असेल तर त्या पर्यायी रस्त्यावरून ही वाहतूक वळविण्यास मदत होईल. तसेच कोणत्या वेळी कोठे वाहतुकीची समस्या निर्माण होते व त्यावर काय तांत्रिक उपाययोजना करायला लागतील, याचाही अंदाज या प्रणालीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे लक्षात येईल. त्यामुळे येत्या काळात पुण्याच्या वाहतुकीबाबत चांगले नियोजन करण्यात येईल. याचबरोबर पुणे व पुणे महानगर प्रदेशचा अंतिम सर्वंकष वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आजच सर्व लोकप्रतिनिधींसमोर त्याचे सादरीकरण करत आहोत. पुढील दहा वर्षांचा विचार करूनच पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर प्रदेश या क्षेत्रात वाहतुकीचे अंदाज, लोकसंख्येचा अंदाज काय आहे, वाहतुकीला कोणते संसाधन लागतील याचे हे सादरीकरण आहे. ते जनतेलाही खुले केले जाईल व त्यातून नागरिकांनादेखील सूचना करता येतील.’’
...............
दोन वर्षांच्या मुलीचा सत्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ व चंदननगर पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, तसेच लोणी काळभोर, नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलिस स्टेशनच्या नवीन इमारती प्रकल्पाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनचे लोकार्पण, ड्रोन फ्लॅग ऑफ करण्यात आले. तसेच त्यांनी आयटीएमएस यंत्रणेची उद्घोषणा केली. पोलिसांनी २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करून धाराशीव येथून सुखरूप परत आणलेल्या कात्रज येथील कोमल काळे या दोन वर्षांच्या मुलीचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात योगदान देणाऱ्या पोलिसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.