संगणकीय विचारशक्ती 
शिक्षण परिषदेला प्रतिसाद

संगणकीय विचारशक्ती शिक्षण परिषदेला प्रतिसाद

Published on

पुणे, ता. ९ : एसीएम इंडिया या संस्थेच्या सीएस पाठशाला शैक्षणिक उपक्रमांतर्गत देशातील शिक्षकांसाठी ‘संगणकीय विचारशक्ती शिक्षण’ या तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आयसर पुणे येथे करण्यात आले होते. या परिषदेत देशातील ३५० हून अधिक शिक्षकांनी, तर १८ राज्यांतील १५०० शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविला.
या परिषदेचे उद्‍घाटन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे, चित्रा बाबू, लक्ष्मी गांधी यांच्या हस्ते झाले. या परिषदेमध्ये जेन वेट, ममता मनकताळा यांनी एआय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्यांवर मार्गदर्शन केले.
‘शालेय शिक्षणात एआयचा वापर’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. अर्पिता करकरे, अनय कामत, अजिंक्य अंबारखाने, डॉ. मनीषा यादव, प्रा. आर. रामानुजम-अझीम प्रेमजी विद्यापीठ यांनी सहभाग घेतला. एआय शिक्षणातील फायदे व तोटे, अडचणी आणि मूल्यांकन प्रक्रियेवरील परिणाम तसेच खासगी व शासकीय शाळांमध्ये अंमलबजावणीतील फरक यावर शिक्षकांशी संवाद साधला.
गणित, विज्ञान, भाषा, समाजशास्त्र, समावेशक शिक्षण, कोडिंग, अनप्लग्ड क्रिया आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासातील संगणकीय विचारशक्तीच्या वापरावर आधारित १२० हून अधिक शिक्षकांच्या नवोन्मेषी उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
‘सकाळ माध्यम समूहा’चे नवीन उपक्रमप्रमुख हेमंत वंदेकर यांनी वर्तमानपत्राचा शिक्षण क्षेत्रातील सहभाग व ‘सकाळ एनआयई’च्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. सीएस पाठशाळा मुख्य समिती सदस्या सोनिया गर्चा यांनी ‘परिषदेचा उद्देश व शिक्षणातील संगणकीय विचारशक्तीचा वापर’ याविषयी मार्गदर्शन केले. एसआयआयएलसी, सकाळ एनआयई, आइसर्टिस, मायक्रोसॉफ्ट रिसर्च, सनराईज इन्फोटेक, युनिटी ईआरपी ॲण्ड एलएमएस हे या परिषदेचे प्रायोजक होते.

Marathi News Esakal
www.esakal.com