व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचा ‘खेळ’
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागून ९८ दिवस, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षेचा निकाल लागून ९० दिवस झाले आहेत. तरीही विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया फारशी पुढे सरकली नाही. दरवर्षीपेक्षा अगोदर बारावीची परीक्षा झाली आणि निकालही लवकर जाहीर करण्यात आले. तरीही राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत नियम बदलण्यास केलेल्या दिरंगाईमुळे वेळापत्रक गडबडणार आहे.
राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी, तर सीबीएसईच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होऊन तब्बल तीन महिने झाले तरीही सीईटी सेलमार्फत प्रवेशाची प्रक्रिया अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे. विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा या बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी झाल्या आहेत. परंतु, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील विविध नियमांत बदल आणि दुरुस्तीसाठी सरकारने दिरंगाई आणि वेळखाऊपणा केला. त्यानंतर, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेशप्रक्रिया टप्प्या-टप्प्याने सुरू केली. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन, प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू होण्यास ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिना उजाडतो. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे प्रथम सत्राचे वेळापत्रक कोलमडते. असे असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सीईटी कक्षाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. पण, बारावीपर्यंत नियमित शिक्षण घेऊन पूर्णपणे नव्या असणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.
प्रथम सत्र वेगाने पुढे सरकणार
सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल असणारे बी.ई आणि बी.टेक या अभ्यासक्रमांसह विधी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमाची ‘कॅप’ प्रवेशाची दुसरी फेरी सध्या सुरू आहे. तर बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेचा हा वेग पाहता, विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षातील प्रथम सत्र खूप वेगाने पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भातील निर्णय घ्यावेत. यासाठी राज्य सरकारने विरोधकांशी समन्वय साधत कालावधी ठरवून घेत सर्व निर्णय घ्यावेत. जेणेकरून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला दिरंगाई होणार नाही. याशिवाय, शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागामधील समन्वय असणे आवश्यक आहे. असे झाल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल.
- केदार टाकळकर, करिअर समुपदेशक
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे टप्पे...
बी.ई/बी.टेक :
- ११ ऑगस्ट : दुसऱ्या ‘कॅप’ फेरीची निवड यादी जाहीर
- १२ ते १४ ऑगस्ट : दुसऱ्या फेरीत निवड यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदत
एलएलबी (पाच वर्षे) :
- १३ ऑगस्ट : दुसरी ‘कॅप’ प्रवेश फेरी सुरू. ॲलॉटमेंट यादी जाहीर होणार
बीबीए/बीएमएस/बीबीएम :
- ८ ऑगस्ट : ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू
- १३ ऑगस्ट : नोंदणीसाठी मुदत
बीसीए :
- ९ ऑगस्ट :- प्रवेशाची प्रक्रिया सुरू
- १४ ऑगस्ट : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीकरिता मुदत
बी.फार्म :
- १२ ऑगस्ट : ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत
- १३ ऑगस्ट : प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुदत
- त्यानंतर ‘कॅप’अंतर्गत प्रवेश फेऱ्या जाहीर होणार
बी. आर्च :
- ७ ऑगस्ट : ऑनलाइन नोंदणीसाठी होती मुदत
- ९ ऑगस्ट : तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
- ११ ऑगस्ट : तात्पुरत्या यादीवर हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत
- १३ ऑगस्ट : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार
तुमचे मत मांडा...
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत नियम बदलण्यास दिरंगाई झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून वेळापत्रकही विस्कळीत होणार आहे. यागबाबत आपले मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.