‘जी २०’प्रमाणे गणेशोत्सवात विद्युतरोषणाई

‘जी २०’प्रमाणे गणेशोत्सवात विद्युतरोषणाई

Published on

पुणे, ता. १४ : ‘‘जी २० परिषदेच्या वेळी ज्याप्रमाणे शहरात विद्युतरोषणाई, स्वच्छता आणि रस्त्यांची डागडुजी करून सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर गणेशोत्सवामध्ये विद्युत रोषणाईसह उपाययोजना करण्याचे ठरले आहे,’’ अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी गुरुवारी दिली. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मध्यवर्ती भागात भुयारी मार्ग उभारणीला प्राधान्य दिले जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचा आढावा तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्यांची पाहणी आमदार रासने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले, रस्ते विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, घनकचरा विभागाचे संदीप कदम, पाणीपुरवठाचे नंदकुमार जगताप, महावितरणचे काकडे, कसबा मंडलाध्यक्ष प्रशांत सुर्वे, अमित कंक, छगन बुलाखे आदी उपस्थित होते.
रासने म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आहे. राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. सर्व भाविकांना चांगल्या पद्धतीचे वातावरण पुणे शहरात बघण्यास मिळेल. या काळात रस्ते, पदपथ, विद्युत, पाणी तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था चांगली असणे गरजेचे आहे. वाहतुकीसंदर्भात रस्ते, पदपथांची दुरुस्ती करणे त्याचसोबत प्रतिबंधित रस्त्यांवर नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी वॉर्डन संख्या वाढवणे, ज्याठिकाणी सिग्नल यंत्रणा नाही तेथे ती उपलब्ध करणे आणि सार्वजनिक व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. कसबा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक असून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे.’’

शहराच्या मध्यवर्ती भागात भुयारी मार्गांची उभारणी प्राधान्याने करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्वरित करता येणाऱ्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन नियोजन या दोन्ही पातळ्यांवर काम सुरू आहे. रखडलेली रस्त्यांची कामे वेगात पूर्ण करणे, पदपथ अतिक्रमणमुक्त करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येत्या वर्षभरात याचे सकारात्मक परिणाम नागरिकांना दिसून येतील.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

रासने म्हणाले...
- गणेशोत्सव कसबा मतदारसंघातून सुरू झाला.
- सर्व प्रमुख गणेश मंडळे ही कसबा मतदारसंघात आहेत.
- ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था केली जाईल.
- पुणे हे रस्त्यांचे नेटवर्क कमी असलेले शहर आहे.
- भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी.
- गणेशोत्सवात भाविकांना जास्तीत जास्त सुविधा, त्रुटी दूर करण्यावर भर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com