पुण्यात रंगणार ‘वाईल्डलाईफ कार्निव्हल’

पुण्यात रंगणार ‘वाईल्डलाईफ कार्निव्हल’

Published on

पुणे, ता. ८ ः देशातील जैवविविधता लोकांसमोर यावी, निसर्गाविषयी अधिकाधिक माहिती मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात ‘वाइल्ड लाइफ कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. देशात ५८ व्याघ्र प्रकल्प आणि ५०० हून अधिक अभयारण्ये आहेत, त्या बाबतचीही माहिती या कार्निव्हलमध्ये नागरिकांना मिळणार आहे. तसेच निसर्गविषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल कार्निव्हलमध्ये असेल.
या कार्निव्हलमध्ये किरण घाडगे, विशाल जाधव यांच्यासह अनेक प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकारांनी बनवलेले दर्जेदार माहितीपट दाखवले जाणार आहे. अनेक निसर्गतज्ज्ञांशी संवाद, दृकश्राव्य माध्यमातील व्याख्याने याचा आस्वाद निसर्गप्रेमींना घेता येणार आहेत. यात आजच्या काळातील विचारवंत युवाल नोआ हरारी यांच्या विचारांवर अभ्यासपूर्ण मांडणीवर गप्पांचा एक वेगळा कार्यक्रम होणार असून मृणालिनी वनारसे आणि सुश्रुत कुलकर्णी यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे, तर डॉ. मंदार दातार त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच ‘कोकणातील कातळशिल्पे’ या विषयावर परिसंवाद होणार असून कोकणातील कातळशिल्प संशोधक आणि संवर्धक सुधीर रिसबूड यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘ट्रेसिंग द बिस्ट्स ऑफ एन्शंट वर्ल्ड - अ स्टोरी थ्रू जिओग्लिफ्स ऑफ कोकण’ हे कोकणातील कातळशिल्पांची माहिती देणारे प्रदर्शनही या कार्यक्रमात असेल. याशिवाय डॉ. वरद गिरी, सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांचीही या दरम्यान व्याख्याने होणार आहेत. सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार राजेश बेदी यांच्या हत्तींवरील पुस्तकाचे या महोत्सवात प्रकाशन होणार आहे. तसेच हत्तींवर त्यांचे व्याख्यानही होणार आहे. दुर्मीळ खनिजे, शंख-शिंपले व चलने यांचे प्रदर्शनही या कार्निव्हलमध्ये असेल.
वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीवन या विषयावर आधारित सोव्हिनिअर स्टॉल्स, निसर्ग विषयावर काम करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स यांचाही या दरम्यान निसर्गप्रेमींना आस्वाद घेता येणार आहे. या कार्निव्हलचे स्वागतमूल्य १०० रुपये असून, त्यातील सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. लोकांमध्ये निसर्ग विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने निसर्गाची माहिती देणारे असे नानाविध कार्यक्रम एका छताखाली पाहण्याची संधी या निमित्ताने निसर्गप्रेमींना मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक निसर्गप्रेमींनी कार्निव्हलला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. मोडगी हेरीटेज डिझाइन्स यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.

हे लक्षात ठेवा
कधी - २५ आणि २६ ऑक्टोबर
कोठे - महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर
वेळ - सकाळी १० ते रात्री ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com