तारखेच्या वादात १७०० जणांचा बोनस अडकला
पुणे, ता. १४ ः पुणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला, पण जवळपास दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सेवेत आलेल्या सुमारे १७०० कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही. महापालिकेने टाकलेल्या अटीची पूर्तता करूनही हे कर्मचारी वंचित राहिले आहेत. याविरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने कामगार संघटनेसोबत झालेल्या करारानुसार यंदाच्या वर्षी मूळ पगार, महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के आणि २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. लेखा व वित्त विभागाच्या प्रमुख उल्का कळसकर यांनी याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक काढताना त्यात ३१ मार्च २०२४ अखेर महापालिकेत सेवा होऊन एक वर्ष झालेले आणि त्यापुढील वर्षात म्हणजे २०२४-२५ मध्ये १८० दिवसांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांना बोनस दिला जाणार आहे, असे नमूद केले आहे.
‘पीएमसी’ कामगार युनियनने यासंदर्भात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे. लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात ३१ मार्च २०२४ अखेर एक वर्ष झालेल्या सेवकाची पुढील वर्षातील हजेरी लक्षात घेऊन बोनस दिला जाईल, असे नमूद केले आहे. पण गेल्या वर्षीच्या परिपत्रकात अशी कोणतीही अट नव्हती. त्यामुळे ३१ मार्च २०२४ ही तारीख वगळून पूर्वीप्रमाणे केवळ ३१ मार्चअखेर सेवेत आलेल्या सेवकास बोनस दिला जाईल, अशी अट समाविष्ट करावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी केली आहे.
नेमके काय झाले?
- पुणे महापालिकेत २०२२ आणि २०२३ मध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांसह अन्य पदांवरील रिक्त जागा भरण्यात आल्या होत्या
- दोन टप्प्यांत सुमारे ८५० कर्मचाऱ्यांची भरती झाली होती
- यातील अनेक कर्मचारी महापालिकेच्या सेवेत रुजू होऊन ६०० ते ७०० दिवस झाले आहेत
- याचा अर्थ त्यांना ३१ मार्च २०२४ पूर्वी एक वर्ष झाले आहे आणि २०२४-२५ मध्ये त्यांनी १८० दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले आहे
- यासह अनुकंप व अन्य प्रकारे महापालिकेत नोकरी मिळविलेले सुमारे १७०० कर्मचारी बोनसपासून वंचित आहेत
- यातील काही कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी बोनस मिळाला आहे, पण यावर्षी नियमावर बोट ठेवून बोनस देण्यात आलेला नाही
सर्वसाधारण सभेचा भराव किंवा बोनस कायद्यात ज्या वेळी एक वर्ष सेवा पूर्ण होते, त्यानंतरच ते बोनससाठी पात्र होतात. त्यानंतर १८० दिवस पूर्ण केले तर बोनस दिला जातो. मागच्या वर्षीदेखील हाच नियम होता.
- उल्का कळसकर, लेखा व वित्त अधिकार, महापालिका
गेल्या वर्षी मला दिवाळीचा बोनस मिळाला होता, पण ३१ मार्च २०२४ पूर्वी मला एक वर्ष झाले आहे, आणि २०२४-२५ मध्ये १८० दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे, तरीही बोनस दिलेला नाही. मनमानी पद्धतीने नियमांचा अर्थ लावून आम्हाला बोनसपासून वंचित ठेवले जात आहे.
- एक कनिष्ठ अभियंता, महापालिका