मंगलमयी दीपोत्सवाला आजपासून सुरुवात

मंगलमयी दीपोत्सवाला आजपासून सुरुवात

Published on

पुणे, ता. १६ ः प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची अन् सकारात्मकतेची पणती प्रज्वलित करणाऱ्या दिवाळीच्या सणाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. लखलखत्या दिव्यांचा प्रकाशमयी सण असणाऱ्या दीपोत्सवानिमित्त शहरात उत्साहाला उधाण आले आहे. शुक्रवारी (ता. १७) वसुबारस असून, या दिवशी पहिला दिवा लावून दिवाळीला प्रारंभ होईल.
भारतीय संस्कृतीतील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळीचा सण साजरा केला जातो. सुख, समृद्धी आणि मांगल्याची चाहूल घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा नवनव्या वस्तूंनी सजल्या आहेत. मागील आठवडाभरापासून पणत्या, आकाशकंदील, कपडे आदींच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळते आहे.
दसरा संपल्यानंतरच दिवाळीची चाहूल लागते आणि सर्वत्र उत्साहाचे वारे वाहू लागतात. दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून आणि फराळाच्या पदार्थांच्या साथीने दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदाही दसऱ्यानंतर दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजायला लागल्या होत्या. सजावटीचे साहित्य, सुगंधी उटणे, तेल, मिठाई यांसह नवे कपडे, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.
दिवाळीचा अविभाज्य भाग असणारे फराळाचे पदार्थ तयार करण्यास वेग आला होता. घरगुती फराळासह बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला मोठी मागणी होती. अनेकांनी फराळातील बरेच पदार्थ घरीच तयार करण्यासही प्राधान्य दिले होते. त्यामुळे लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा आदी पदार्थांचे खमंग सुगंध घरोघरी दरवळत होते.

हे लक्षात ठेवा
- रमा एकादशीला दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो
- या वर्षी रमा एकादशी आणि वसुबारस शुक्रवारी (ता. १७) एकत्र
- धनत्रयोदशी शनिवारी (ता. १८)
- नरक चतुर्दशी सोमवारी (ता. २०)
- लक्ष्मीपूजन मंगळवारी (ता. २१)
- दिवाळी पाडवा बुधवारी (ता. २२)
- भाऊबीज गुरुवारी (ता. २३)

लक्ष्मीपूजन मंगळवारीच
‘‘नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रदोषकाळात अमावास्या असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. २१) सूर्योदयापासून सायंकाळपर्यंत अमावास्या असलेल्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी सूर्यास्तापूर्वी अमावास्या संपत असली तरीही मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत) लक्ष्मीपूजन करावे, संभ्रम करून घेऊ नये’’, असे स्पष्टीकरण दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com