पानशेतची समूह शाळा परिवर्तनाचे मॉडेल चमकदार कामगिरी ः उपेक्षित घटकांतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात
पुणे, ता. १६ ः पानशेतमध्ये करण्यात आलेली समूह शाळा सध्या आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील परिवर्तनाचे प्रभावी मॉडेल ठरत आहे. या शाळेमुळे कोरोना काळानंतर शिक्षणापासून दूर चाललेल्या उपेक्षित घटकांमधील विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. या मुलांची शैक्षणिक प्रगती झालीच, शिवाय परकीय भाषांसह क्रीडा स्पर्धामध्ये शाळेतील विद्यार्थी चमकत आहेत. या शाळेच्या धर्तीवर आता खेड तालुक्यातील वाडामध्ये जिल्हा परिषदेने दुसरी समूह शाळा सुरू केली आहे.
पानशेत येथील समूह शाळेमुळे विद्यार्थ्यांना एकत्रितपणे उत्तम शिक्षण, आधुनिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षक आणि वैविध्यपूर्ण शिक्षण मिळत आहे. त्यामुळे या शाळेचा दर्जा उंचावला गेला. या अनुभवाच्या आधारे जिल्हा परिषदेकडून वाडा येथेही अशाच स्वरूपाची शाळा सुरू केली आहे. पानशेत शाळेचा विद्यार्थी पट पूर्वी फक्त ३४ इतका होता. २०२३ मध्ये समूह (क्लस्टर) शाळा सुरू झाल्यानंतर तो वाढून ८४ झाला. सध्या या शाळेत १४९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक सुविधा, शिक्षक आणि पायाभूत सुविधा एका ठिकाणी उपलब्ध आल्याने शाळेची उल्लेखनीय प्रगती झाली आहे. विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रावीण्यात मोठी सुधारणा केली असल्याचे निपुण मूल्यांकनातील कामगिरीवरून दिसून येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शाळेत असलेल्या काही विद्यार्थ्यांकडे कागदपत्रे नव्हती. ज्यामध्ये जन्मदाखले, आधार कार्ड नसल्याने शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरण्यासाठी अडचणी होत्या. त्यावर शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे तयार केली. विद्यार्थ्यांना वयानुसार प्रवेश देण्यात आला. हे सर्व विद्यार्थी आता अस्खलितपणे वाचन करत असल्याचे ही शिक्षक सांगतात.
या गोष्टींची गरज...
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी प्रयोगशाळेची गरज आहे. प्रयोगशाळेसाठी सर्व साहित्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. कोडिंगसाठी प्रशिक्षित शिक्षकाची तसेच आणखी भौतिक सुविधांची या शाळेला गरज आहे. जिल्हा परिषद राबवत असलेल्या मॉडेल शाळेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा येथील शिक्षकांना आहे.
विद्यार्थ्यांसाठी दोन बस...
पानशेतच्या शाळेत येण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून दोन बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आंबेगाव, चिमकोडी, शिर्केवाडी, कादवे, कुरण खुर्द, कुरण बुद्रूक, वरचीवाडी, मधलीवाडी, पडाळवाडी, मोसे, सांडघर, आंबी, देशमुखवाडी या गावांमधून पानशेतच्या शाळेत विद्यार्थी बसच्या माध्यमातून येत आहेत.
‘‘माझ्या मुलीला जर्मन भाषेचे ज्ञान आहे. तिने मला शिकवले आणि मी शाळेतील विद्यार्थ्यांना. माझ्याबरोबर शुभांगी थेटे या शिक्षिकाही जर्मन भाषा शिकवतात. जिल्हा परिषद आणि लोकसहभागातून शाळेसाठी चांगली कामे झाली आहेत. समूह शाळेचा प्रयोग आम्ही सर्व शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकतो, हे सिद्ध केले आहे.
- शबाना खान, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, पानशेत
‘‘पानशेतमध्ये समूह शाळा करण्यात आल्यानंतर त्याच धर्तीवर आम्ही वाडा येथे समूह शाळा सुरू केली आहे. त्या शाळेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सध्या प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
फोटो ः 60649
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.