फटाके फोडताय? सावधानता बाळगा अग्निशामक दलाकडून विशेष जनजागृती मोहीम
पुणे, ता. १७ : दिवाळीच्या उत्सवात निष्काळजीपणामुळे आगीसारख्या भीषण घटना घडतात. मागील चार वर्षांत फटाक्यांशी संबंधित आगीच्या घटनांत वाढ झाली असून, गतवर्षी २०२४ मध्ये आगीच्या ६० घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाने यंदा ‘फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम’ हाती घेतली आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये सजगता निर्माण करणे आणि घटनांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील सर्व २३ अग्निशामक केंद्रांना खबरदारीच्या सूचना दिल्या असून, नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाके स्टॉलजवळही सुरक्षितता वाढविण्यात आली असून, नागरिकांना जनजागृती संदेश पाठविण्यात येत आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- फटाके नेहमी मोकळ्या जागेतच फोडावेत.
- लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीशिवाय फटाके फोडू देऊ नयेत.
- फटाके हातात धरून पेटवू नयेत, अर्धवट फटाके पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न टाळावा.
- नायलॉनऐवजी सुती कपडे वापरावेत.
- पेटते दिवे, मेणबत्त्या, अगरबत्त्या फटाक्यांपासून दूर ठेवाव्यात.
- फटाके फोडताना सुरक्षित अंतरावर उभे राहावे.
- गॅस सिलिंडर, वाहने किंवा विजेच्या तारा यांच्याजवळ फटाके फोडू नयेत.
- घरात, वाहनांत किंवा तळमजल्यात फटाक्यांचा साठा करू नये. विक्रेत्यांनी अग्निशमन विभागाची परवानगी घेऊनच साठा करावा.
- विक्री केंद्रात अग्निशामक यंत्र ठेवणे बंधनकारक आहे.
- प्रदूषण टाळण्यासाठी ‘हरित फटाके’ वापरावेत.
- फटाके संपल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवावा.
- आग लागल्यास पाणी किंवा वाळू वापरून आटोक्यात आणावी
- घटना घडल्यास तातडीने १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अग्निशामक दलाची विशेष तयारी :
- सर्व २३ केंद्रे आणि पथके २४ बाय ७ सतर्क.
- दिवाळी कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द.
- फटाके स्टॉल परिसरात गस्त आणि जनजागृती मोहीम सुरू.
- नियंत्रण कक्ष सतत कार्यरत, तक्रारींवर त्वरित प्रतिसाद.
दिवाळीतील आगीच्या घटना -
वर्ष- घटना
२०२१- २१
२०२२- १९
२०२३- ३५
२०२४- ६०
दिवाळीचा आनंद सुरक्षिततेसोबतच साजरा करावा. निष्काळजीपणा टाळा, मुलांवर लक्ष ठेवा आणि पर्यावरणपूरक फटाके वापरा. कोठेही आग लागल्यास त्वरित १०१ क्रमांकावर संपर्क साधा. सुरक्षित दिवाळी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
आपत्कालीन संपर्क :
१०१ / ०२०-२६४५१७०७ / ९६८९९३५५५६
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.