दोनशेहून अधिक गणेश मंडळांना नोटीस
पुणे, ता. २६ ः सर्वोच्च न्यायालयाने गणेश विसर्जन सोहळ्यासाठी ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २०० हून अधिक मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ध्वनिप्रदूषणाबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी मंडळांना नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे.
‘मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे लेखी म्हणणे, परवानगी पत्र, तसेच विसर्जन सोहळ्यात ध्वनिवर्धक यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या व्यावसायिकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, मिरवणूक परवाना अशा कागदपत्रांसह मंडळ असलेल्या हद्दीतील परिमंडळाच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहावे. मंडळाचे पदाधिकारी हजर न राहिल्यास मंडळाचे काहीही म्हणणे नसल्याचे समजून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ नुसार थेट गुन्हा दाखल केला जाईल’, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील गणेश विसर्जन सोहळा सात सप्टेंबरला पार पडला. यंदा विक्रमी वेळ मिरवणूक सुरू होती. या मिरवणूक सोहळ्यात मंडळांनी उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक आणि प्रखर प्रकाशझोत वापरू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले होते. मंडळांना त्याबाबतच्या सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. मात्र विसर्जन सोहळ्यात बहुतांश मंडळांनी उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा आणि प्रकाशझोतांचा वापर केला होता, तसेच पोलिसांनी आवाहन केल्यानंतर मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केले. त्यामुळे मिरवणुकीत ज्या-ज्या मंडळांनी नियमांचा भंग केला त्यांना आता नोटीस बजाविण्यात येत आहे.
पाच वर्षांपर्यंत कैद, एक लाख दंडाची तरतूद
ध्वनिप्रदूषण मर्यादा भंग केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६च्या कलम १५ अन्वये गुन्हा दाखल होतो. या गुन्ह्यास पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
सात दिवसांत स्पष्टीकरण द्या ः मंडळांना सूचना
सर्वोच्च न्यायालयाने गणेश विसर्जन सोहळ्यासाठी ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या नियमांचे उल्लंघन आपण केले आहे. त्यामुळे या शिक्षेस पात्र ठरणारा गुन्हा का दाखल करू नये, याबाबत मंडळांनी कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असे नोटिशीत नमूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

