गाथा मणिपूरची
गाथा मणिपूरच्या शाळांची...
लीड
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे प्रणेते भय्याजी काणे यांचा जन्मशताब्दी वर्ष समापन सोहळा येत्या शनिवारी (ता. २९) भय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यानिमित्त मणिपूर येथील प्रतिष्ठानच्या कार्याविषयीचे अनुभव.
--------
पूज्य भय्याजी काणे यांच्या प्रेरणेने व जयवंतजी कोंडविलकर यांच्या कामाने प्रभावित होऊन तेथील काम प्रत्यक्ष पाहण्याच्या उद्देशाने हेमा होनवाड व मी, एक महिन्यासाठी मणिपूरला १० वर्षांपूर्वी गेलो होतो. तिथल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या तीन शाळांमध्ये दहा-दहा दिवस राहून तेथील व्यवस्थापन, अभ्यासक्रम व पुस्तकांचा आढावा घ्यायचा व शिक्षकांचे प्रशिक्षण करायचे, असा कार्यक्रम ठरला होता. जाताना मी इंफाळला आर्मी युनिटमधील शाळेत प्रशिक्षण करायला गेले होते.
प्रथम खारासोमच्या शाळेला जाणार होतो. तेथील व्यवस्थापक रिंगफामी आम्हाला घ्यायला आठ तास प्रवास करून आले होते. १६० किलोमीटर प्रवास करण्यास आठ तास का लागतात, ते उखरुलनंतरच्या प्रवासात कळले. एका एसयूव्हीमध्ये आम्ही दहा जण व अकरावा चालक असे होतो. रस्त्यात कुणी हात दाखवला की गाडी थांबायची. चुरमुऱ्याच्या पोत्याने स्वतः हलावे तसे हलून आम्ही जागा करायचो. खड्ड्यातून गाडी गेली की जागा आपल्याआप व्हायची. मग कुणीतरी अजून आत यायचा! येथे एक गोष्ट कळली, अवाजवी अपेक्षांचे ओझे नसले तर जीवन सुकर होते. खारासोममधील काम संपवून तेथील भाषेतील चार वाक्ये शिकून आम्ही तमीनलॉन्गला पोहोचलो. तेथील शाळा टिनपत्र्यांची. राहायची व्यवस्था वर्गावरच्या खोलीत. जमिनीवर झोपायचो. बाकी आम्ही खारासोमला शिकलेल्या भाषेचा काही उपयोग झाला नाही! प्रत्येक भागातील जमातीची भाषा वेगळी. मात्र मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्या सर्वांना इंग्रजी येत होती. त्यामुळे प्रशिक्षण करणे शक्य झाले. जीवघेणी थंडी, तुफान पाऊस, पण शिकण्याची व शिकवण्याची प्रबळ इच्छा यामुळे यश आले.
शिक्षक आमच्या पुढच्या भेटीची वाट पाहू लागले. त्यातून मग अलका गोडबोले, शिरीष अत्रे व मी अशी टीम निर्माण झाली व आम्ही दरवर्षी प्रशिक्षणासाठी जाऊ लागलो चुराचांदपूर येथील पु. शंकर काणे विद्यालय ही शाळा रम्य परिसरात वसलेली! इतक्या सुंदर जागी शाळा बिनभिंतीची असावी, असा विचार मनात क्षणभर आला. पण तिथल्या पाऊस व थंडीचा विचार केला, तेव्हा ह्या शाळेला पक्क्या भिंती हव्यात हा विचार पक्का झाला व निधी संकलनाचे काम सुरू केले. नंतर शाळेच्या भिंती उभ्या राहिल्या तो आनंदाचा क्षण ! आता पण तेथे लोकांमध्ये भिंती निर्माण झाल्या हे दुःखदायक आहे! शिक्षक मुलांबरोबर जात आणि येत. प्रशिक्षण करायचे केव्हा असा प्रश्न पडला. मुख्याध्यापकांनी तो ताबडतोब सोडवला, बेल वाजवून! पालकांना न सांगता, विचारता शाळा सोडता येते याचे आश्चर्य वाटले, पण त्याहून जास्त आश्चर्यकारक होते ते म्हणजे सगळी मुले अगदी वय वर्षे चारचीही शाळेला एकटी येत-जात. आम्ही काम संपवून दोन तासांनी निघालो, तेव्हा मुले शेतांमध्ये गोगलगायी गोळा करताना दिसली. मनात म्हटले रात्रीच्या जेवणाला त्यांचा हातभार! मणिपूरला जाताना आपण शिक्षकांना आणि मुलांना शिकवायला जात आहोत, या भावनेने जाणारी मी आणि उलट तेथून बरेच काही शिकून येणारी मी यात नक्कीच अंतर होते!
आमच्यासाठी स्वयंपाक करणारे, शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना हिंदी शिकवणारे खारासोमजी बसंतजी, गरीब विद्यार्थ्यांची झोपडीवजा घरे दाखवून त्यांना फी देणे का परवडत नाही, हे समजून घेणारे चुराचंदपूरचे शोपूजी, धड इमारत नसताना नेटाने शाळा चालवणारे तमिंगलोन्गचे मायकाजी, उखरुलला जेवणाची व्यवस्था करणारे स्टॅन्डहॉपजी, मला दरवेळी विमानतळावर न्यायला आणि पोहोचवायला येणारे चित्तरंजनजी, किती नावे घेणार? त्यांच्यातील अगदी सामर्थ्यशाली दुवा म्हणजे त्या सर्वांना मराठी बोलता येते आणि मुख्य म्हणजे ते सर्व भय्याजींचे शिष्य आहेत व घरचे कार्य असल्यासारखे कार्य करणाऱ्या जयवंतजींचे सहकारी आहेत! मुख्याध्यापकांसाठी वेगळी खुर्ची, पण नसलेल्या शाळांनी खूप शिकवले! पूज्य भय्याजींनी लावलेल्या बीजाचा वृक्ष झाला आहे. खत पाणी घालणार तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते! त्यातून आपल्याला देश जोडायचा आहे व राष्ट्रप्रेमी भारतीय निर्माण करायचे आहेत!
अलका वैद्य
ज्येष्ठ शिक्षिका आणि कार्यकारिणी सदस्य, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

