यशस्वी जीवनासाठी योग्य मनोवृत्ती आवश्यक : डॉ. लीना देशपांडे
पुणे, ता. २७ : ‘‘जीवनात ज्ञान आणि कौशल्य पुरेसे ठरत नाही तर आपली मनोवृत्ती काय आहे, यावर यश अवलंबून असते. ज्ञान, कौशल्य, मनोवृत्ती, मूल्ये आणि एक माणूस म्हणून परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक असते. माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते,’’ अशा शब्दांत भारत फोर्ज लिमिटेडच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सहयोगी उपाध्यक्ष आणि औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
डॉ. देशपांडे म्हणाल्या,‘‘रोजच्या जगण्यात आपण विशिष्ट मते घेऊन वावरत असतो. मात्र, त्याकडे जागरूकपणे लक्ष देण्याची गरज असते. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जाणून घेतल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. सातत्य, नम्रता, कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मक विचार, अपयश पचवण्याची तयारी आणि निग्रह यातच यशाचे गमक आहे. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन लर्निंग यांसारखे नवीन तंत्रज्ञानदेखील आत्मसात केले पाहिजे. संवाद कौशल्य हा कळीचा विषय आहे. आपल्याकडे असलेल्या क्षमता आणि कौशल्य ठामपणे मांडण्याचे सध्याचे दिवस आहेत. त्यादृष्टीने आवश्यक असलेली संवाद कौशल्ये प्रत्येकाने शिकली पाहिजेत.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन मानसी उस्तूरीकर यांनी केले. कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

