

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ : ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) राबविण्यात येणाऱ्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख-सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजने’ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे सारथीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी निधी उपलब्ध असतानाही ‘सारथी’ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे का दुर्लक्ष करत आहे? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
‘सारथी’तर्फे २०२२-२३ पासून मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविली जाते. यामध्ये देशातील नामांकित २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित दरवर्षी सुमारे ३०० विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान या योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र यंदा नोव्हेंबर महिना संपत आला तरी जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
याविषयी शुभम जगदाळे म्हणाला, ‘‘सारथी संस्थेकडून राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना अनेकदा दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्या आहेत. यामध्ये आता देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेची भर पडत असल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेताना, त्यांना या शिष्यवृत्तीतून आर्थिक मदत मिळेल, या विश्वासावर शैक्षणिक नियोजन केले होते. मात्र, योजनेची प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे हे विद्यार्थी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या योजनेची जाहिरात अजून लांबली, तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. परिणामी गुणवंत असूनही, केवळ आर्थिक पाठबळ वेळेवर न मिळाल्याने त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘सारथी’ने ही जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी.’’
निधीची तरतूद असूनही अनास्था...
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी या शिष्यवृत्तीसाठी चार कोटी ५७ लाखांची तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे निधीची तरतूद असूनही ‘सारथी’तर्फे या योजनेसाठी अनास्था का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
संशोधन अधिछात्रवृत्तीचा बोजा अन्य योजनांवर...
‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती दिली जाते. या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ‘सारथी’वर साधारण १९० कोटींचा बोजा वाढला आहे. त्यामुळे ‘सारथी’च्या देशांतर्गत शिष्यवृत्तीसारख्या विद्यार्थी हक्काच्या अनेक योजना रखडल्या असल्याची माहिती ‘सारथी’तील सूत्रांनी दिली. ‘‘या योजनेसाठी लागणाऱ्या निधीसाठी पुरवणी मागणी केली आहे. लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल,’’ असे ‘सारथी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यातील एक महाविद्यालय सारथीच्या यादीमध्ये नसल्याने सारथीची शिष्यवृत्ती मिळेल या आशेवर मी त्या महाविद्यालयाचा प्रवेश नाकारला. एका वर्षाच्या अंतराने मुंबईतील एका महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. वसतिगृह, शिकवणी शुल्क आणि पुस्तके मिळून माझा वार्षिक खर्च साधारण दोन लाख रुपये आहे. ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळेल आणि माझे शिक्षण पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जाहिरातच न आल्याने शिष्यवृत्ती मिळणार की नाही, याची कोणतीही खात्री राहिली नाही. त्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
- गणेश जगदाळे, विद्यार्थी
माझे आई-वडील शेतकरी आहेत. यंदा मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आणि घरची आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यामुळे मी प्रवेश घेताना ही शिष्यवृत्ती मिळेल, या खात्रीवर सगळे नियोजन केले होते. मात्र नोव्हेंबर संपत आला तरी जाहिरात प्रसिद्ध
केली नाही. शिष्यवृत्ती मिळाली नाही तर केवळ फी भरू शकत नाही म्हणून माझे एक वर्ष वाया जाईल, इतकेच नव्हे तर कदाचित शिक्षणही बंद करावे लागेल. आमच्या भविष्याचा विचार करून ही प्रक्रिया लवकर सुरु करावी.
- वेदांत चौधरी, विद्यार्थी
तुमचे मत मांडा...
‘सारथी’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख-सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजने’ची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. तसेच या योजनेसाठी निधी उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत आपले मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.