उड्डाणपुलावरील त्रुटीमुळे कंबरडे मोडले
पुणे, ता. ४ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गणेशखिंड रस्त्यावर राजभवन ते ईस्क्वेअर दरम्यान कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधला. मात्र, संबंधित उड्डाणपुलावरील जाड आकारातील रम्बलर्स व कमी-जास्त उंचीच्या विस्तार सांध्यामुळे (एक्सपांशन जॉइंट) दुचाकी खराब होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यावर वाहनांना हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर दुचाकीस्वारांना कंबरेचे व मणक्याचे त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलापेक्षा पुलाखालील रस्ता बरा, असे म्हणण्याची वेळ दुचाकीस्वारांवर आली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषी महाराज चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमआरडीए’मार्फत बहुमजली उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचा राजभवन ते ईस्क्वेअर दरम्यानचा भाग ‘पीएमआरडीए’कडून काही महिन्यांपूर्वी खुला करण्यात आला. त्यामुळे गणेशखिंड रस्ता व विद्यापीठासमोरील चौकातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात फुटल्याची चिन्हे आहेत, मात्र संबंधित उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांतच उड्डाणपुलावरील त्रुटी पुढे आल्या. उड्डाणपुलावरील जाड आकाराचे पिवळे रम्बलर्स, पुलाच्या दोन भागांना जोडणारे कमी-जास्त उंचीच्या विस्तार सांध्यामुळे चारचाकी वाहने, तीनचाकी व दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आदळत असल्याचे उघड झाले होते. ‘सकाळ’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ‘पीएमआरडीए’ने तेथे काही प्रमाणात काम केले.
‘पीएमआरडीए’ प्रशासन आता तरी जागे होऊन रम्बलर्स व विस्तार सांध्यांची तत्काळ दुरुस्ती करून पुलावरील रस्त्याच्या समतल करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
अशी आहे स्थिती
- रम्बलर्स व विस्तार सांध्यांचे काम व्यवस्थित व पूर्णपणे करण्यात आले नाही
- विस्तार सांध्यांवर काही प्रमाणात डांबर टाकण्यात आले, मात्र त्यामुळे ही समस्या दूर झाली नाही
- याउलट आता उड्डाणपुलावरून दुचाकी घेऊन जाताना अक्षरशः हादरे बसतात
- या उड्डाणपुलाचा सातत्याने वापर करणाऱ्या रिक्षा, दुचाकींची चाके जोरात आदळत असल्याने दोन्ही चाके खराब होऊ लागली आहे
- त्याच्या दुरुस्तीसाठी ५-१० हजार रुपयांचा भुर्दंड वाहनचालकांवर पडू लागला आहे
- वाहने खराब होऊ लागल्याने दुचाकीस्वारांकडून उड्डाणपुलाऐवजी पुलाखालील रस्त्याचा वापर केला जाऊ लागला आहे
- वाहने खराब होण्याबरोबरच रिक्षा, दुचाकी चालकांना कंबरदुखी, मणक्याचाही त्रास होऊ लागला आहे.
राजभवन ते स्क्वेअर दरम्यानच्या उड्डाणपुलाचा वापर मी नियमितपणे सुरू केला, मात्र उड्डाणपुलावरील रम्बलर्स व वस्ताद सांधे व्यवस्थित नाहीत. त्यामुळे दुचाकीची चाके आपटून दुचाकी खराब झाली. दुचाकी दुरुस्तीसाठी ८ ते १० हजार रुपये खर्च आला. कंबरदुखी-मणक्याचा त्रासही वाढला आहे. आम्ही नोकरदार आहोत, हा खर्च परवडणारा नाही. आता हा खर्च ‘पीएमआरडीए’ आम्हाला भरून देणार का?
- गौरव भोसले, नोकरदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

