पारंपरिक थेरपींचे उपचार एकाच छताखाली
पुणे, ता. ४ : सध्याच्या धकाधकीच्या काळात ॲलोपॅथीबरोबरच प्रतिबंधात्मक उपचार, शरीरासह मनावरही उपचार करणाऱ्या विविध उपचार थेरपींची गरज पडते. हीच गरज आरोग्य विभागाचे औंध येथील जिल्हा आयुष रुग्णालय पूर्ण करत आहे. येथे आयुष, होमिओपॅथी व निसर्गोपचाराच्या माध्यमातून नागरिकांना पारंपरिक पद्धतीचे उपचार पुरवत आहे. या उपचारांना दिवसेंदिवस प्रतिसादही वाढत आहे.
शारीरिक व्याधींवर ॲलोपॅथीची औषधे तत्काळ आराम मिळवून देतात. मात्र, काही व्याधी, आजार अशा असतात की त्या केवळ ॲलोपॅथीच्या औषधोपचारांनी तात्पुरत्या बऱ्या होत असल्या तरी मुळातून बऱ्या होत नाहीत. त्यासाठी त्यांना ॲलोपॅथीसह आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा संयुक्त व परंपरागत उपचारपद्धतीचीदेखील (इंटिग्रेटेड मेडिसिन) गरज पडते, तर मानसिक ताण कमी करणारे नैसर्गिक उपचार व मन-शरीर आधारित थेरपींचेही उपचार औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील राज्यातील पहिले आयुष रुग्णालय पुरवत आहे.
खासगी रुग्णालयास तोडीस तोड वाटावे, असे हे सरकारी रुग्णालय २५ मार्च २०२४ मध्ये प्रशस्त इमारतीमध्ये कार्यान्वित झाले असून, येथे दररोज सकाळी योगाचे सत्र होतात. बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्णांची समस्या, उपचारांचा इतिहास, जीवनशैली यावरून मूल्यमापन केले जाते. नंतर प्रकृती पाहून त्यांना आयुष, युनानी, होमिओपॅथी की प्राकृतिक उपचार (नॅच्युरोपॅथी) द्यायचे हे ठरवले जाते.
महत्त्वाचे
१) आयुष उपचारांमध्ये पंचकर्म, अग्निकर्म, विरेचन, बस्ती, शिरोधारा, वमन, नस्य, स्नेहस्वेदन, कपिंग, कटीबस्ती, देतात.
२) यापैकी काही दिवसभरात तर काहींसाठी दोन ते तीन दिवस थांबावे लागू शकते
३) छोट्या प्रक्रिया जसे मूळव्याधीसाठी क्षारसूत्रही केले जाते
४) रुग्णांनी कोणता आहार-विहार घ्यावा, किती घ्यावा, ऋतूनुसार कोणते पंचकर्म करावे याबाबतही मार्गदर्शन केले जाते
५) औषधी व दुर्मीळ वनस्पतींची माहिती देणारे ‘आयुष गार्डन’देखील विकसित करण्यात येत आहे
हे ३० खाटांचे रुग्णालय आहे. येथे खासकरून जुनाट आजार (क्रोनिक इलनेस) प्रतिबंधात्मक उपचार केले जातात. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाटते, त्यांना येथे प्रतिबंधात्मक उपचार व योग्य जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले जाते. दिवसाला येथे तर बाह्यरुग्ण विभागात दररोज १३० ते १४० सर्वच वयोगटाचे रुग्ण येतात व १५ ते २० पंचकर्म होतात. वयोवृद्धांचा प्रतिसाद अधिक आहे. उपचारानंतर रुग्णांचा प्रतिसाद हा क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे नोंदविला जातो.
- डॉ. बालाजी लकडे, वैद्यकीय अधीक्षक, आयुष जिल्हा रुग्णालय
कोणत्या आजारांवर होतात उपचार?
- पचनसंस्था, सांधेदुखी, पक्षाघात, मानसिक विकार
- गोठलेला खांदा (फ्रोझन शोल्डर), जुनाट त्वचाविकार, लहान मुलांचे आजार
- रक्तदाब, मधुमेह, मूळव्याध, फिस्तूला
- केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करणारे उपचार
- वजनावरील नियंत्रण, आहार नियंत्रण, झोप याबाबत मार्गदर्शन
- प्राकृतिक चिकित्सेत जलन्येती, जलोका
- उपचारांची वेळ ९ ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते ६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

