जिद्द अन् सक्षमीकरणाला सलाम !
पुणे, ता. ३ : दिव्यांगांच्या आत्मविश्वासाला आणि जिद्दीला सलाम करणाऱ्या जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात ‘स्पंदन’ संकेतस्थळ व ‘विचारधन’ व्यासपीठास बुधवारी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यामुळे दिव्यांग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. याप्रसंगी झालेल्या आनंद मेळाव्यालाही मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
बालकल्याण संस्थेमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त महेश पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि नॅशनल पॅरा योगाच्या समन्वयिका डॉ. सुनंदा राठी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थी आणि मुलांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्पंदन’ या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावरून २१ प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार आवश्यक असलेली उपकरणे, साधने आणि शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. भविष्यात या संकेतस्थळाद्वारे दिव्यांगांचे सामाजिक विश्लेषण करणेही शक्य होणार आहे. तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव, विचार आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालणारे ‘विचारधन’ हे व्यासपीठ संस्थेच्या यू-ट्यूब चॅनेलवर सुरू करण्यात आले. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला.
बालकल्याण संस्थेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास त्यासाठी आमचे कायमच सहकार्य असेल, अशी ग्वाही गोयल यांनी दिली. या वेळी पुनर्वसनाच्या दिशेने ‘कौशल्यातून विकासाकडे’ हे पाऊल टाकत ‘लेंड हॅन्ड इंडिया’ संस्थेच्या मदतीने कुकिंग, गार्डनिंग आणि इलेक्ट्रिक स्किल्स या तीन कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली.
दिव्यांग व्यक्तींसाठी काही करण्याची वृत्ती समाजात निर्माण होत नाही, तोपर्यंत त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अवघड असते. यासाठी बालकल्याण संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. ही दिव्यांग क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांचे कायमच सहकार्य असेल.
- महेश पाटील,
आयुक्त, दिव्यांग कल्याण विभाग
बालकल्याण संस्थेचे सातत्यपूर्ण योगदान दिव्यांगांना कायमच नवी दिशा देते. आगामी काळात संस्थेला जेव्हा कधी शासकीय मदतीची गरज लागेल, तेव्हा आम्ही तत्पर असू. प्रायोजकत्वाच्या माध्यमातून संस्थेतील ४५० कर्णबधिर मुलांना मोफत कर्णयंत्रे दिली. या यंत्रांमुळे अनेक मुलांनी त्यांच्या आईचा आवाज पहिल्यांदाच ऐकला, हा क्षण हृदयस्पर्शी होता.
- गजानन पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
..
मी स्वतः आई असल्याने मुलांच्या भावना आणि गरजा समजू शकते. या मुलांचे कार्यक्रम पाहून त्यांच्यामध्ये कोणतीही कमतरता आहे, असे मला कुठेही वाटले नाही. पालक आणि शिक्षकांकडून मिळणाऱ्या आधारातूनच दिव्यांग खऱ्याअर्थाने जीवनाच्या प्रवाहात घडतात. आपली पौराणिक दिमाखदार परंपरा त्यांच्यापर्यंत पोचविणे गरजेचे आहे. राज्याला संतांची मोठी परंपरा आणि शिवरायांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचे विचार मुलांमध्ये रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- स्मिता शेवाळे, अभिनेत्री
हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर मुलांसाठी आयोजित केलेला भव्य आनंद मेळावा आहे. आम्ही दरवर्षी शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करतो. संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी आणि अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने बालकल्याण संस्था कार्यरत आहे. याच सामूहिक प्रयत्नांमुळे आज ही संस्था देशातील सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, बालकल्याण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
