

पुणे, ता. ३ ः लहान मुलांमध्ये वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण होऊन वाहतूक शिस्तीचे पालन करणारी नवी पिढी तयार व्हावी, यासाठी महापालिकेने तयार केलेले औंधमधील ‘मुलांसाठीचे वाहतूक उद्यान’ (चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क) अनेक महिन्यांपासून अक्षरशः वापराविना पडून आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या उदासीनतेमुळे वाहतूक उद्यानाकडे मुलांची पावले वळत नसल्याची सद्यःस्थिती आहे.
महापालिकेच्या पथ विभागाकडून २०२१ मध्ये औंधमधील ब्रेमेन चौकात ‘मुलांसाठीचे वाहतूक उद्यान’ सुरू करण्यात आले. प्रारंभी खासगी व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून संबंधित वाहतूक उद्यानाला भेटी देण्यास प्राधान्य दिले जात होते. विशेषतः स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले जात होते. काही महिने संबंधित उद्यानास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर महापालिकेच्या पथ व शिक्षण विभागांच्या उदासीनतेमुळे वाहतूक उद्यानाकडे अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आले.
खासगी व महापालिकेच्या शाळांमधील विद्याथी, शिक्षक, पालक यांच्याकडून वाहतूक उद्यानास पसंती दिली जात होती. त्यानंतर या उद्यानासंबंधी अधिकाधिक शाळा, विद्यालयांमध्ये महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीची गरज होती. मात्र, पथ विभाग व शिक्षण या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या उद्यानास भेटी देणाऱ्यांची संख्या घटू लागली. तर, मागील वर्षभरापासून संबंधित वाहतूक उद्यान वापराविना पडून आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी पथ विभाग, शिक्षण विभाग यांच्याकडून ठोस प्रयत्न केले जात नाहीत. दररोज सफाई करण्याव्यतिरिक्त या उद्यानाचा वापर होते नाही.
दरम्यान, संबंधित ठिकाणी दृकश्राव्य चित्रफीत, वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन व सायकलींद्वारे प्रात्यक्षिक दाखविले जात होते. आता त्यासही थंड प्रतिसाद मिळत आहे. मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम एका स्वयंसेवी संस्थेकडून केले जात होते, मात्र संबंधित संस्थेनेही आता काम थांबविले आहे. महापालिकेकडून संबंधित संस्थेकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांना स्वयंसेवी संस्थांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या उद्यानावर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करूनही सध्या ते वापराविना पडून आहे.
उद्यानाची ही आहेत वैशिष्ट्ये
- रस्त्याचे मॉडेल - १६० मीटर लांब व ४ मीटर रुंद
- रस्त्यांवरील चौकात सिग्नल यंत्रणा
- आवश्यक तेथे वाहतुकीची चिन्हे
- रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा पट्टे
- पदपथ, गतिरोधक व सायकल ट्रॅक
शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खासगी व महापालिका शाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उद्यान बंद असल्याचे दिसत होते. दिवाळीनंतर पुन्हा उद्यान सुरू केले आहे. महापालिकेच्या शाळा व खासगी शाळांमधील मुलांच्या या उद्यानास भेटी वाढणे गरजेचे आहे.
- योगेश देवकर, उपअभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका
विविध राज्यांमधील शहरांनीही गिरवले ‘ट्रॅफिक पार्क’चे धडे
पुणे महापालिकेकडून मुलांसाठीचे वाहतूक उद्यान हा प्रयोग पहिल्यांदा राबविण्यात आला. प्रारंभी शहरातील खासगी व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत होता. दरम्यान, विविध राज्यांमधील मोठ्या शहरांमधील पथकांनी या उद्यानाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी आपापल्या शहरांमध्ये वाहतूक उद्यान विकसित करण्यास प्राधान्य दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.