पुण्यात विमानप्रवासी वेठीस 
‘इंडिगो’चा गोंधळ ः तब्बल ३६ हून अधिक विमानांचे उड्डाणे रद्द

पुण्यात विमानप्रवासी वेठीस ‘इंडिगो’चा गोंधळ ः तब्बल ३६ हून अधिक विमानांचे उड्डाणे रद्द

Published on

पुणे, ता. ४ ः वैमानिकांची कमतरता व पार्किंग बे मिळत नसल्याने पाच - सहा तास प्रवाशांना घेऊन थांबलेले विमान यामुळे गुरुवारी पुणे विमानतळावर अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ‘इंडिगो’च्या विमानांना उशीर होत असल्याने त्याचा फटका पुणे विमानतळावरील प्रवाशांना बसला. विमानतळाचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले. परिस्थिती इतकी बिघडली, की काही प्रवासी संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी धावले. मात्र, वेळीच ‘सीआयएसएफ’ जवानांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. गुरुवारी तब्बल ३६ हून अधिक विमाने रद्द झाली तर १० हून अधिक विमानांना मुंबई, गोवा, इंदूर विमानतळ गाठावे लागले. ६० हून अधिक विमानांना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे तीन तासाहून अधिक विलंब झाला. गुरुवारी देशांतर्गत विमानसेवा व प्रवासी वेठीस असल्याचे चित्र होते.
पुणे विमानतळावर बुधवारी रात्रीपासून विमानसेवा कोलमडण्यास सुरवात झाली. बुधवारी रात्री अकरा ते गुरुवारी सकाळी ७ पर्यंत सुमारे १६ विमाने रद्द झाली. त्यानंतर दिवसभरात हा आकडा ३६ हून जास्त झाला. ‘इंडिगो’ च्या विमानांना पुणे विमानतळावर दाखल होण्यास व उड्डाणास सर्वात जास्त विलंब होत होता. त्याचा परिणाम अन्य विमानांच्या वाहतुकीवर देखील होण्यास सुरवात झाली. पुणे विमानतळाच्या १० पैकी ९ पार्किंग बे हे देशांतर्गत विमानांसाठी वापरली जातात. गुरुवारी सकाळच्या सत्रात या सर्व ९ ‘पार्किंग बे’ ची विमाने लागली. त्यामुळे अन्य विमान कंपन्यांच्या विमानाला ‘पार्किंग बे’साठी थांबावे लागले. काही विमानांना तीन तासांहून अधिक वेळ वाट पहावी लागली.
----------------------
विमान प्रवाशांचे हाल
-पुणे विमानतळावर दाखल झालेल्या विमानांना ‘पार्किंग बे’ मिळत नव्हता.
- अनेक प्रवासी विमाने हे टरमॅक व टॅक्सी वे वर थांबून होते.
- पुण्यात दाखल झालेले प्रवासी हे सहा तास विमानात बसून, ‘पार्किंग बे’ ला विमान जाण्याची वाट पाहत होते.
- ‘इंडिगो’च्या विमानातील प्रवासी वैमानिकांच्या प्रतीक्षेत होते.
-----------
विमानतळ प्रशासनाचा दणका :
- इंडिगोच्या विमान व वैमानिकामुळे पुणे विमानतळावरची परिस्थिती बिघडत चालल्याने विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरवात केली.
- लँडिंगसाठी सुरवातीला इंडिगोला प्रथम प्राधान्य दिले गेले. नंतर मात्र दुसरे प्राधान्य देण्याचे ठरले.
- परिणामी अन्य विमान कंपन्यांच्या विमानांना आधी उतरण्यास परवानगी मिळाली.
- टॅक्सी वे, टरमॅक वरची विमानांची गर्दी कमी करण्यासाठी लँडिंगवर मर्यादा आणली.
- लँडिंग झालेले विमानांचे पुन्हा उड्डाण होत नाही, तो पर्यंत अन्य प्रवासी विमानांना लँडिंग साठी परवानगी नाकारली.
-------------------
विमानतळावरचे गुरूवारचे चित्र :
- तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांच्या रांगा
- टर्मिनलमध्ये प्रवाशांचा गोंधळ
- काही प्रवासी कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी धावले
- प्रवाशांना लगेज मिळण्यात अनेक अडचणी.
- ‘इंडिगो’च्या विरोधात प्रवाशांची घोषणाबाजी
----------------------
‘‘विमान कंपनीच्या अडचणीमुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. टर्मिनल व्यवस्थापन व सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. टर्मिनलमधील प्रवाशांची गर्दी व विमानांचे व्यवस्थापन करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
- संतोष ढोके, विमानतळ व्यवस्थापक, पुणे विमानतळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com