तेजवाणीला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
गुन्हेगारी कटात आणखी कोण कोण आहेत, याचा पोलिसांकडून तपास

तेजवाणीला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी गुन्हेगारी कटात आणखी कोण कोण आहेत, याचा पोलिसांकडून तपास

Published on

पुणे, ता. ४ ः गुन्हेगारी कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिस तपास करत असून, मूळ वतनदार यांच्याकडून घेतलेले मूळ पॉवर ऑफ अॅटॉर्नी, मूळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करायचे आहेत. २७२ मूळ वतनदारांच्या वारसांबरोबर केलेल्या खरेदी विक्री दस्तामध्ये पैशांची देवाण घेवाण झालेली नसल्याचे दिसत असून, त्याबाबत तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात वापरलेले डिजिटल डिव्हाईल गुन्ह्याच्या तपासासाठी तिच्याकडून जप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी गुरुवारी (ता. ४) न्यायालयास दिली.
व्यवहाराची रक्कम तेजवाणीने घेतली आहे का? घेतली असेल तर ती कोणत्या प्रकारे घेतली आहे? याबाबत विचारपूस करून सखोल तपास करायचा आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आरोपीला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अमित जाधव यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी तेजवाणीला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अटकेची आवश्यकता नव्हती ः
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी बोलावले, तेव्हा तेजवाणी या पोलिसांत हजर झाला होत्या. आत्तापर्यंत तीनहून अधिकवेळा त्यांची चौकशी झाली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या ‘एफआयआर’मध्ये तेजवाणी यांच्याविषयीची उल्लेखच नाहीत. त्यांची या गुन्ह्यात काहीच भूमिका नाही. पोलिसांनी त्यांना अटक करताना नियमावली पाळलेली नाही, असा युक्तिवाद तेजवाणी यांचे वकील अजय भिसे यांनी केला. महार वतनदारांच्यावतीने ॲड. अरुण सोनावणे यांनी बाजू मांडली.

तीन तासांहून जास्त वेळ युक्तिवाद ः
तेजवाणीला गुरुवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या रिमांड रिपोर्टवर सव्वातीनला युक्तिवाद सुरू झाला. संध्याकाळी साडेसहापर्यंत याबाबत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास न्यायालयाने पोलिस कोठडीचा आदेश दिला. तेजवाणीला हजर केल्यानंतर न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मिळकत आरोपीच्या ताब्यात नव्हती
खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया कंपनी’ यांनी केलेला मालक असल्याचा उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्वे ऑफ इंडियाच्या ताबे वहीवाटीत आहे. ही मिळकत कधीही आरोपीच्या ताब्यात नव्हती. या गुन्ह्या‍चा सखोल तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद जिल्हाधिकारी यांच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.


युक्तिवादादरम्यान तेजवाणीला चक्कर ः
न्यायालयात सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू असतानाच शीतल तेजवाणीला चक्कर आल्याचा दावा तिने केला. त्यानंतर न्यायाधीशांनी तिला समोरील खुर्चीवर बसण्यास परवानगी दिली‌. तिला मराठी समजत नाही, तरीही तिला मराठीतून नोटीस बजावण्यात आली, असे तिच्या वकीलांनी न्यायालयास सांगितले. त्यावर ॲड. यादव यांनी जोरदार आक्षेप घेतला.

Marathi News Esakal
www.esakal.com