विमान प्रवासी आता आर्थिक कोंडीत 
‘इंडिगो’मुळे अन्य विमान कंपन्यांकडून तिकीट दरात वाढ

विमान प्रवासी आता आर्थिक कोंडीत ‘इंडिगो’मुळे अन्य विमान कंपन्यांकडून तिकीट दरात वाढ

Published on

पुणे, ता. ५ ः ‘इंडिगो’मुळे देशातील हवाई क्षेत्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पेचामुळे प्रवासी दोन दिवस विविध विमानतळावर अडकून पडले. शुक्रवारी परिस्थिती सामान्य करण्यासाठी ‘इंडिगो’ने विमानांची उड्डाणे रद्द केली. या पार्श्वभूमीवर अन्य विमान कंपन्यांनी आता प्रवाशांना आर्थिक कोंडीत पकडले. पुण्याहून दिल्लीसाठी शनिवारी (ता. ६ ) तिकीट दर सुमारे ५४ हजार रुपये इतका झाला. याहून कमी तिकीट दर हे मुंबईहून लंडनसाठी आहे. लंडनसाठी उद्याचे तिकीट हे २१ हजार रुपये आहे.
‘इंडिगो’मुळे देशांतर्गत विमानसेवेचा पुरता बोजवारा उडाला. दोन - दोन दिवस विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी पर्यायी वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. हवाई क्षेत्रात गेल्या ५० वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. विमाने रद्द झाल्याने उपलब्ध विमानांनी प्रवास करण्याकडे प्रवाशांचा ओढा राहिला. हे लक्षात घेऊन काही विमान कंपन्यांनी नफा कमविण्यासाठी वाटेल तेवढे तिकिटाचे दर वाढवले आहेत. विमानाचे दर खऱ्या अर्थाने गगनाला भिडले. सामान्य दिवशी पुण्याहून दिल्लीसाठी ५ ते ६ हजार रुपयांचा तिकीट दर असतो. शनिवारी मात्र तो ५४ हजार रुपये एवढा झाला आहे. केवळ दिल्लीच नाही तर देशातील अन्य शहरांचे तिकीट दर देखील प्रचंड प्रमाणात वाढले.
प्रवासी अडचणीत असताना विमान कंपन्यांनी तयार केलेली ही कृत्रिम दरवाढ प्रवाशांची आर्थिक कोंडी करणारी ठरली.
------------------
शहर सामान्य तिकीट दर आताचे तिकीट दर
पुणे - दिल्ली ५ ते ६ हजार ५१ ते ५४ हजार
पुणे - चेन्नई ५ ते ६ हजार ३२ ते ३४ हजार
पुणे- बेंगळुरू ४ ते ५ हजार १८ ते २० हजार
पुणे- हैदराबाद ४ ते ५ हजार २२ ते २५ हजार
पुणे - जयपूर ५ ते ६ हजार ३३ ते ३५ हजार
पुणे - डेहराडून ७ ते ८ हजार ३३ ते ३४ हजार
पुणे - चंडीगड ४ ते ५ हजार १९ ते २० हजार
पुणे - रांची ५ ते ६ हजार १९ ते २० हजार.
---------------
‘‘डीजीसीए’ने ‘एफडीटीएल’ संदर्भात नियमामध्ये सुधारणा करणार हे सर्वच विमान कंपन्यांना माहीत होते. तरी त्याचे पालन ‘इंडिगो’सारख्या मोठ्या कंपनीकडून झाले नाही. शिवाय हे नियम लागू करताना कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची माहिती देखील ‘डीजीसीए’ला होती. तरी देखील त्यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. आजच्या परिस्थितीला हे दोघेही जबाबदार आहेत. याचा फटका मात्र प्रवाशांना सहन करावा लागतो.
-नीलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन ऑफ पुणे.

Marathi News Esakal
www.esakal.com