पुणे पुस्तक महोत्सव

पुणे पुस्तक महोत्सव

Published on

पुणेकर वाचणार, अवघं विश्व पाहणार !
-------------------------------------------
लीड
-------
पुणे पुस्तक महोत्सवात यंदाही ‘शांतता...पुणेकर वाचत आहेत’ हा अभिनव उपक्रम
मंगळवारी (ता. ९) सकाळी ११ ते १२ या काळात राबवला जाणार आहे. या एका तासात हजारो नव्हे तर लाखो पुणेकर आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन करून, गिनिज बुकमधील विश्व विक्रमाचा नवीन अध्याय लिहिणार आहेत.

-राजेश पांडे,
मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
-------------------------------------------

पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात, हे या शहरात आल्याशिवाय लक्षात येत नाही. कारण पुणेकरांची सांस्कृतिक ओळख प्रत्यक्ष पुणेकर बनून राहिल्याशिवाय उमगणारी नाही. एवढी एकत्मतेतील विविधता या शहरात वसलेली आहे. साहित्य प्रेमाने ओथंबून वाहणारी ज्येष्ठ आणि अनुभवी पिढी ते सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेली आजची तरुण पिढी आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजनासाठी उत्सुकता शिगेला पोहोचलेली ही पिढी अनुभवत आहोत.
वाचनाची परंपरा जोपासताना पुणेकरांनी ज्ञानाची आणि विचार स्वातंत्र्याची मूलभूत वाट धरली आहे. या परंपरेला पुनर्जीवित करण्याचा, नव्या पिढ्यांच्या हातात पुन्हा पुस्तकांची शिदोरी देण्याचा आणि संपूर्ण समाजात वाचन संस्कृतीचे बीज पेरण्याचा संकल्प घेऊन पुणे पुस्तक महोत्सवाने मागील दोन वर्षांत ऐतिहासिक मैलाचे टप्पे पार केले आहेत. याच यशस्वी पार्श्वभूमीवर यंदाही ‘शांतता...पुणेकर वाचत आहेत’ हा अभिनव उपक्रम अधिक मोठ्या स्तरावर आयोजित होत आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळी ११ ते १२ या एका तासात हजारो नव्हे तर लाखो पुणेकर आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन करून, गिनिज बुकमधील विश्व विक्रमाचा नवीन अध्याय लिहिणार आहेत. नागरिकांनी http://photoupload.pbf25.in या संकेतस्थळावर वाचन करत असतानाचे आपले छायाचित्र अपलोड करून, या जागतिक उपक्रमाचा भाग व्हावे, असे आवाहन करत आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तकांची गोडी मागे पडत असली तरी, त्याचे महत्त्व आजही तितकेच अनिवार्य आहे. कारण, वाचन हे आपल्या विचारांना दिशा देते, मनाला विश्वास देते, भाषाशैली सुधारते, तर्कशक्ती वाढवते आणि विशेष म्हणजे मानसिक आरोग्याला स्थैर्य देते. पुस्तकांचे पान चाळले की आपण सर्वप्रथम स्वतःशी जोडले जातो आणि त्या माध्यमातून समाजाशी, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे वाचन संस्कृती पुन्हा घराघरात रुजवणे, हा केवळ एक उपक्रम नाही तर सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे.
पुणे पुस्तक महोत्सवातील ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम सुरवातीला एका कल्पनेतून जन्माला आला. ज्यामध्ये ‘एक तास फक्त पुस्तकांसाठी’ असा विचार होता. २०२३ मध्ये पहिल्याच वर्षी या संकल्पनेला पुणेकरांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. घरे, शाळा, महाविद्यालये, दुकाने, कार्यालये, उद्याने, बसस्थानके अगदी कारागृहातही पोलिस आणि कैद्यांनी एकत्र येऊन पुस्तकांसोबत मैत्री केली. त्या शांततेच्या एका तासात सर्वजण आपल्या पुस्तकांत हरवले. याच उपक्रमातून हजारो पालक आणि मुलांना एकत्र आणत, चीनच्या जुन्या विक्रमाला मागे टाकून एक नवा विश्व विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला, ज्याची देशभर चर्चा झाली.
पुणे शहरात २०२३ मध्ये पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून पुस्तक प्रदर्शन आयोजनास सुरवात झाली. शहराच्या किंबहुना राज्याच्या मागील १०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच एवढ्या मोठ्या स्तरावर पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले गेले. साहजिकच पुण्याच्या साहित्यप्रेमी भूमीने याचे स्वागत करत, भरभरून प्रेम दिले व त्याला वाचन ‘उत्सवा’चे स्वरूप दिले. पुणे पुस्तक महोत्सवाची सर्वात मोठी देणगी काय आहे? असे जर कोणी मला विचारले तर मी त्यांना आवर्जून सांगेल, की या महोत्सवाने वाचन संस्कृतीला केवळ आवडीपुरते मर्यादित न ठेवता तिला लोकचळवळ बनवले. त्यातही विशेषतः युवकांच्या सहभागाची चळवळ बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. कारण युवकांनी या महोत्सवाला आपलेसे केले, भरभरून प्रेम दिले आणि महोत्सव राज्यभर आणि देश-विदेशात पोहोचवला.
दुसऱ्या वर्षी २०२४ मध्ये या उपक्रमाची लोकप्रियता एवढी वाढली, की महाराष्ट्र शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला. राज्यभरातील लाखो नागरिकांनी एक तास वाचनासाठी दिला आणि आपल्या वाचनासह पुस्तकांचे फोटो महोत्सवाला पाठवले. या प्रचंड प्रतिसादातून ‘सर्वाधिक पुस्तकांच्या छायाचित्रांचा संग्रह’ हा आणखी एक जागतिक विक्रम रचला गेला. महाराष्ट्राच्या वाचनप्रेमाची जगभर नोंद घेतली गेली आणि वाचनाचा हा उपक्रम ‘महालोकचळवळ’ बनला. या महोत्सवाचा मुख्य उद्देश हाच आहे, की लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा एकदा जनमानसात रुजवणे. त्यांना पुस्तकांकडे परत आणणे आणि युवकांच्या हातात त्यांचे मित्र म्हणून पुस्तकाला देणे. ज्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाला यश येताना दिसत आहे. ज्यात ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत!’ या उपक्रमाचा देखील वाटा राहिलेला आहे.
या चळवळीच्या यशाचा परिणाम थक्क करणारा होता. मागील वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाला तब्बल १० लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. २५ लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची विक्री झाली आणि व्यवहाराचा आकडा ४० कोटींवर पोहोचला. यात ४५ टक्के वाचक युवक होते, आमच्यासाठी हाच खरा आशेचा किरण ठरला आहे. ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या एका वाक्याने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एका धाग्यात बांधले. शहरातील सर्व स्तरातील नागरिक ते नियोजित महोत्सव स्थळी स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण ‘वाचक’ या एकाच ओळखीने एकत्र उभे राहिल्याचे आम्ही पाहिले आहे. ज्यातून पुस्तकांनी ज्ञानाबरोबरच समतेचाही संदेश दिला आहे. त्यामुळे यंदा देखील या उपक्रमाला नक्की यश येईल आणि आपण विश्व विक्रम साकारू, याबाबत मला खात्री आहे.
ही वाचन चळवळ पुढील टप्प्यावर जात असताना, यंदा १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान पुणे शहरात पुणे पुस्तक महोत्सवाचे तिसरे पर्व अधिक भव्य रूपात साकारत आहे. पुस्तकांच्या स्टॉलची संख्या ८०० पेक्षा जास्त झाली आहे. कार्यक्रमाची व्याप्तीही अधिक व्यापक झाली आहे आणि नव्या सांस्कृतिक उपक्रमांनी महोत्सव अधिक समृद्ध झाला आहे. ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ पासून सुरू झालेली ही चळवळ आता ‘शांतता... महाराष्ट्र वाचत आहे’ या रूपात राज्याच्या प्रत्येक भागात पोहोचण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
यंदाचा ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत!’ हा वाचन कार्यक्रम केवळ कोणाचा विक्रम मोडण्यासाठी नसून, आपल्यात दडलेल्या वाचन संस्कृतीला नव्याने उजाळा देण्यासाठी आहे. त्यामुळे ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान प्रत्येक नागरिकाने एक तास आपल्या आवडत्या पुस्तकासाठी राखून ठेवावा आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, ही विनंती आपणास करत आहे.
आपण वाचा, फोटो अपलोड करा आणि जगाला दाखवा- ‘पुणेकर वाचणार, अवघं विश्व पाहणार’
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com