कालव्याच्या जागेचे ‘जलसंपदा’कडूनही सर्व्हेक्षण
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान जमिनीखालून (बोगद्यातून) पाणी देण्याचा प्रकल्प जलसंपदा विभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे सुमारे ३० किलोमीटर लांबीचा कालवा आणि बेबी कालवा यांच्यामधील सुमारे पाचशे ते एक किलोमीटर लांबीच्या मालकीच्या जागेचे काय करावयाचे, त्यातून विभागाला उत्पन्न कसे मिळेल आणि प्रकल्पासाठीचा खर्च कशा पद्धतीने उभा करता येईल, यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे काम जलसंपदा विभागाने स्वतंत्रपणे निविदा काढून एका सल्लागार कंपनीला दिले आहे.
प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याची सुमारे ५०० मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची जागा उपलब्ध होणार आहे. त्यातील काही भाग महापालिका व ‘पीएमआरडीए’ हद्दीत येते. या दरम्यान प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जागा हस्तांतरित करता येईल का, त्यांच्या माध्यमातून काही निधी उभारता येईल का, यांची चाचपणी करण्याचा आदेश मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार महापालिकेने कालवा बंद केल्यानंतर नेमकी किती जागा उपलब्ध होऊ शकते. त्याच जागेचा काय वापर करता येईल, याचे सर्वेक्षण एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करून केले होते. संबंधित सल्लागार कंपनीने खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या कॅनॉलचे सर्वेक्षण करून प्रारूप अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. आता जलसंपदा विभागाने स्वतंत्रपणे या जागेचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. संबंधित सल्लागार कंपनीकडून लवकरच अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर त्या जागेबाबतचा निर्णय राज्य शासनाची मान्यता घेऊन त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आली.
महत्त्वाचे
- खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान कालवा बंद करून बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली
- जलसंपदा विभागाने तयार केलेल्या या प्रकल्पास राज्य सरकारबरोबरच पर्यावरण खात्यानेही यापूर्वीच मंजुरी दिली आहे
- त्यानुसार प्रत्यक्षात जागेवर कामालाही सुरुवात झाली आहे
- सुमारे दीड हजार कोटींची ही योजना
- या योजनेमुळे सुमारे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार
अशी आहे स्थिती
१) खडकवासला धरणापासून ते फुरसुंगीतील महापालिकेच्या हद्दीपर्यंतच्या कॅनॉल आणि त्यांच्या दोन्ही बाजूच्या जागेचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात आले आहे
२) कालवा बंद केल्यानंतर सुमारे ६५ लाख १९ हजार ४८५.४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होऊ शकते
३) त्यापैकी ७ लाख ७७ हजार ३२९.९१ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण झाले असल्याचे दिसून आले आहे
४) सर्वेक्षण करताना शेतीसाठी पाणी सोडण्यात येणारा कालवा आणि खडकवासला ते पर्वती या दरम्यान बेबी कालव्यामधून टाकलेली जलवाहिनी अशा दोन्ही कालव्यांच्या जागेचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात आले आहे
अतिक्रमणे काढावी लागणार
कालवा आणि कालव्याच्या दोन्ही बाजूंची जागा ही जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात खडकवासला धरणाच्या भिंतीपासून ते फुरसुंगीपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या जागेवरील अतिक्रमणे जलसंपदा विभागाला काढावी लागणार आहेत. तरच त्या जागेचा वापर अन्य कारणांसाठी करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

