अखेर २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली
सकाळ इम्पॅक्ट
-------------------
संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली
विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर ः ४ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होणार
पुणे, ता. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २१ डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत आयोगाने परीक्षा पुढे ढकलली असून, आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २ आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी एकत्रितपणे २१ डिसेंबरला होणार आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ही आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पातळीवर परीक्षेचे सर्व नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे असते. मात्र, २१ डिसेंबरला जिल्हाधिकारी आणि महसूल विभागातील संपूर्ण यंत्रणा मतमोजणीत व्यग्र राहणार असल्याने परीक्षा केंद्रांवरील नियंत्रण आणि पारदर्शक व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबरला परीक्षा नियोजित वेळेत होणार की पुढे ढकलली जाणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या गोंधळाकडे लक्ष वेधत ‘एमपीएससी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची गंभीर दखल घेत आयोगाने अखेर संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात आयोगाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे.
याविषयी मयूर शिरोडे म्हणाला, ‘‘मतमोजणी आणि एमपीएससी गट ‘ब’ पूर्व परीक्षा ही २१ डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर झाल्यानंतर आम्ही प्रचंड संभ्रमात होतो. जिल्हा प्रशासन संपूर्णपणे निवडणूक प्रक्रियेत अडकलेले असताना परीक्षेचे नियोजन कसे होणार, परीक्षाकेंद्रांवरील नियंत्रण कोण ठेवणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. अशा परिस्थितीत ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांचा प्रश्न गांभीर्याने मांडला. या बातमीची दखल घेत आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परिणामी हजारो विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी झाला.’’
------------------
‘‘मतदानाची मतमोजणी आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी झाल्यास संपूर्ण व्यवस्था कोलमडण्याची शक्यता स्पष्ट होती. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळाला आहे. तसेच आता परीक्षाकेंद्रांबाबत चिंता न करता, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणार आहे.’’
- मोईन शेख, विद्यार्थी
-------------------
फोटो ः 74642
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

