कष्टकऱ्यांचा डॉक्टर, सत्यशोधकांचा वारसा - अंबर आढाव (डॉ. बाबा आढाव यांचे धाकटे चिरंजीव)
बाबा आढाव यांचं वय ९६ वर्षांचं, असामान्य सामाजिक कार्याने लखलखणारं, तत्त्वनिष्ठ, समर्पित आयुष्य. शेवटच्या काही वर्षांत कर्करोगामुळे सतत रुग्णालय, अतिदक्षता विभाग असं सुरू होतं. शरीर थकत होतं, कमकुवत होत होतं; पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या डोक्यात आणि मनात एकच गोष्ट चालू होती, ती म्हणजे कष्टकरी माणूस, असंघटित कामगार, त्याचा सन्मान, त्याचे हक्क.
त्यांच्याकडे बघताना त्यांचे असंख्य मोर्चे-आंदोलनं, किती वेळा अटक, किती वेळा तुरुंग, लाठ्यांचे फटके आणि शेवटी आजारपण असं सगळं आठवतं.
मला नेहमी वाटतं की वसंत बापटांची ही कविता जणू बाबांवरच लिहिलेली आहे -
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ॥१॥
हे ‘बाभुळझाड’ म्हणजेच अथक, अशांत आपले बाबा. आपल्याला महात्मा फुले प्रत्यक्ष पाहायला मिळाले नाहीत. पण मी फुले जगताना पाहिले ते बाबांमध्ये. सत्यशोधक परंपरेची मशाल फुल्यांनी पेटवली; ती मशाल खांद्यावर घेऊन परिवर्तनाची वाटचाल करणारा खंदा वारस म्हणजे बाबा. नाना पेठेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. लहान वयातच वडिलांचं निधन; त्यांची आई आणि आमची आजी बबूताई, हिने पाच मुलांना कष्टानं वाढवलं.
त्या छोट्या नाना पेठेच्या घरात विठ्ठल भक्ती होती, पण त्याचबरोबर विद्रोही तुकारामांच्या समतेचे आणि संघर्षाचे बीज लहान बाबांच्या मनात खोल रुजलेलं होतं. या घरच्या संस्कारांवर नंतर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. जातिभेद, अन्याय, असमानता याविरुद्ध लढणं हा केवळ विचार नव्हता; तर ती त्यांची नैसर्गिक दिशा झाली.
किशोरवयातच बाबा राष्ट्र सेवादलात सक्रिय झाले. एस. एम. जोशी, भाऊसाहेब रानडे, ना. ग. गोरे, राममनोहर लोहिया या समाजवादी नेत्यांच्या सहवासातून त्यांच्या विचारांना ठोस राजकीय-सामाजिक चौकट मिळाली. पुढे भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापू कलदाते या सहकाऱ्यांसोबतची आजन्म सोबत महाराष्ट्रातील समाजवादी आणि सत्यशोधक परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय ठरली.
डॉक्टरपासून ते ‘कष्टकऱ्यांचा डॉक्टर’
बाबांनी १९५२ मध्ये नाना पेठेत दवाखाना सुरू केला. दुष्काळ, अन्नटंचाई, रेशनिंगचा काळ. अशा वेळी काही हमाल-माथाडी कामगार दवाखान्यात आले आणि म्हणाले, ‘‘डॉक्टर, आमच्यासाठी पुढे या. आमच्यासाठी उभं राहायला कुणीच नाही.’’ हा प्रसंग बाबांच्या आयुष्यातील वळणबिंदू होता. याच क्षणापासून त्यांनी फक्त रुग्णांचा नव्हे, तर संपूर्ण असंघटित कष्टकरी समाजाचा डॉक्टर व्हायचं ठरवलं.
हमाल पंचायत आणि माथाडी कायदा
पुण्यातील हमाल-माथाडी कामगारांना संघटित करून बाबांनी हमाल पंचायत उभी केली. सततचा संघटित संघर्ष, सत्याग्रह आणि आंदोलनांमधून या वर्गाला प्रथमच किमान वेतन, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युटी आणि सन्मानाने काम करण्याचा अधिकार मिळाला. याच कामाचा परिपाक म्हणजे ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर हातमजूर कामगार कायदा’. दलितांना गावातील पाणवठ्यावर समान हक्क मिळावा यासाठी बाबांनी ‘एक गाव- एक पाणवठा’ ही चळवळ उभारली. १९७२ मध्ये त्यांनी ‘कष्टाची भाकर’ हा उपक्रम सुरू केला. ही फक्त ‘स्वस्त खानावळ’ नव्हती; तर ती कामगारांच्या स्वाभिमानाची ताटली होती. कष्टकरी माणसाला परवडणारा पण सन्मानाने खाता येईल असा घास मिळावा, हा हेतू या कामामागे होता.
भाई-बाबा, अनिल अवचट आणि सत्यशोधक परंपरा
भाई वैद्य हे त्यांचे केवळ राजकीय सहकारी नव्हते; ते प्रत्यक्षात भावासारखे होते. गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र, समाजवादी
राजकारण, कष्टकरी चळवळी, सत्यशोधक परंपरा- जिथे बाबा, तिथे भाई आणि जिथे भाई, तिथे बाबा! दुसरी बाजू म्हणजे डॉ. अनिल अवचट. नाना पेठेतील बाबांचा छोटासा दवाखाना अनिल आणि डॉ. अनिता अवचट यांनी गरीबांसाठीच्या समाजवैद्यकीय सेवेच्या दवाखान्यात बदलला. अनिल अवचट यांच्या लेखणीतून बाबांचं काम, त्यांची करुणा, कष्टकऱ्यांबद्दलचा राग, त्यांची समाजवादी संवेदना महाराष्ट्रातील हजारो वाचकांपर्यंत पोहोचली.
पडद्यामागील आधारस्तंभ
बाबांच्या प्रचंड कामामागे एक अत्यंत महत्त्वाचा, पण सतत पडद्यामागे राहिलेला आधारस्तंभ आहे- माझी आई, शीलाताई आढाव. ज्या काळात बाबा मोर्चे, सत्याग्रह, तुरुंग, दौरे यांत गुंतले होते, त्याच काळात आईने परिचारिका म्हणून नोकरी, घराची सर्व जबाबदारी, दोन्ही मुलांची जडणघडण, सासूची सेवा हे सगळं निर्विघ्न पार पाडलं. जगाने, लाठ्यांनी, तुरुंगांनी, आजारांनी ज्यावेळी बाबा कोलमडले, त्यावेळी त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम शांतपणे, हसतमुखानं आईनेच केलं.
आमचा विस्तारित परिवार
बाबांच्या अखेरच्या आजारपणात डॉ. अभिजित वैद्य यांनी केवळ वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नव्हे तर; बाबांचा वसा पुढे घेऊन जाणारा एक खंदा सत्यशोधक म्हणून जबाबदारी घेतली. बाबांनी आम्हाला फक्त रक्ताच्या नात्यांचा परिवार दिला नाही; त्यांनी आम्हाला एक प्रचंड मोठा विस्तारित परिवार दिला. हमाल-माथाडी कामगार, कष्टाची भाकरमधली माणसं, पथारी विक्रेते, कागद-काच-पत्रा कामगार, बांधकाम कामगार, रिक्षावाले, कार्यक्षम कार्यकर्ते, सहकारी, मित्रमंडळ ही सगळी माणसं केवळ संघटनेचे सभासद नाहीत; ही सगळी माणसं बाबांनी जोडलेला परिवार आहेत.
आज त्यांच्या जाण्याचं दुःख आहे. पण मला वाटतं, त्यांचं खरं स्मारक कुठलीही मूर्ती नाही, कोणतीही इमारत नाही; त्यांचं खरं स्मारक म्हणजे सन्मानाने सरळ चालणारा कष्टकरी माणूस, त्याच्या हक्कांचं रक्षण करणारे कायदे आणि अजूनही या समाजवादी मूल्यांवर उभा राहणारा प्रत्येक कार्यकर्ता. यापुढे जेव्हा-जेव्हा कुणी कष्टकऱ्यांच्या अधिकारांसाठी, जात-धर्माच्या नावाने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पुढे येईल, तेव्हा कुठेतरी बाबांचा हात, बाबांची सावली, त्यांचा वसा आणि पुरोगामी सत्यशोधकी वारसा सोबत असेल, असं मला आज ठामपणे वाटतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

