...अन् कष्टकऱ्यांच्या आंदोलनाचा सोनचाफा दरवळत राहीला !
...अन् ‘सोनचाफा’ दरवळत राहिला
पुणे, ता. ८ ः अवघी हयात रस्त्यांवरील मोर्चे, आंदोलनांमध्ये गेलेल्या डॉ. बाबा आढाव यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आंदोलनांमधील सहभाग, कष्टकऱ्यांसाठीचा संघर्ष सुरूच ठेवला. अगदी त्याच ऊर्जेने, त्याच उत्साहाने १७ नोव्हेंबरच्या महापालिकेसमोर पथारी व्यावसायिकांच्या आंदोलनातही थरथरत्या पायांनी, अवघडलेल्या अवस्थेत बाबा पोचले. त्यांनी तब्बल पावणे दोन तास तेथे थांबून आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढविला. त्याही अवस्थेत आपल्या खणखणीत आवाजात मार्गदर्शनही केले, आंदोलनकर्त्यांची मनेही जिंकली. पण, आपला आधारवड असणाऱ्या बाबांचे ते अखेरचे आंदोलन असेल, अशी कोणी कल्पनाही केले नसेल. त्या आंदोलनानंतर काही दिवसांतच बाबा दवाखान्यात दाखल झाले अन् त्यानंतर सुगंधी ‘सोनचाफा’ कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभरासाठीचा दरवळ सोडून गेला....!
कधी हमाल, दलित, कागद-काच-पत्रा वेचकांसाठी रस्त्यावर उतरणे...तर, कधी धरणग्रस्त, पथारी व्यावसायिक, रिक्षा चालकांसाठी कित्येक आंदोलनाद्वारे आवाज उठविणारे, प्रत्येक कष्टकऱ्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तिमत्त्व वाटावे, एवढी त्यांच्याविषयी आत्मीयता होती. पाठीवर धान्याचे पोते घेऊन जाणाऱ्या हमालांपासून ते कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या कचरावेचक भगिनीही अगदी सहजतेने ‘आपले बाबा आले’ म्हणून साद घालायचे आणि बाबाही तितक्याच प्रेमाने, आपुलकीने त्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून आपल्या अंगणातील सोनचाफ्याचे फूल हातात देत त्यांना आपलेसे करून घ्यायचे. कष्टकरी, उपेक्षित, दुर्लक्षित व असंघटित कामगारांचे आंदोलन बाबांशिवाय पूर्ण व्हायचे नाही. ऊर्जेने भारलेले बाबा आंदोलनांमध्ये कायम आघाडीवरच होते. शहरातील कुठलाही चौक, धूळ-माती, ऊन, वारा, पाऊस कुठेही आंदोलनांमध्ये आंदोलनकर्त्यांच्या एक पाऊल पुढे बाबांचे होते. वाढते वयोमान व आजारांनी ग्रासलेले असूनही कुठलेही आंदोलन बाबांकडून चुकले नाही. अगदी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी महापालिकेसमोर पथारी व्यावसायिकांसाठी झालेले आंदोलनही त्यास अपवाद ठरले नाही.
पथारी व्यावसायिकांवर महापालिकेकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पथारी व्यावसायिक संस्थेकडून १७ नोव्हेंबर रोजी मोहन चिंचकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन झाले. दुपारी १२ वाजता डॉ. बाबा आढाव थरथरत्या पायांनी, अवघडलेल्या अवस्थेतही आंदोलनस्थळी दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांमध्ये अक्षरशः उत्साह संचारला. महात्मा फुले यांच्या ‘सत्य सर्वांचे आदि घर, सर्वधर्मांचे माहेर’ हा अखंड सर्वांसमवेत सादर करून आंदोलनात ऊर्जा भरून डॉ. आढाव यांनी आपल्या खणखणीत भाषणाला सुरवात केली. त्यांच्या न्याय हक्कांसाठी डॉ. आढाव भररस्त्यात आंदोलनकर्त्यांसमवेत बसून राहिले. शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पावणे दोनच्या सुमारास डॉ. आढाव तेथून परतले. त्यानंतर काही दिवसातच ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आणि अखेर सोमवारी कष्टकऱ्यांचा सोनचाफा त्यांच्या आयुष्यात आपला दरवळ निर्माण करून कायमचा गेला !
---------------------
फोटोः 74848
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

