पायाभूत सुविधांमुळे पुणे उद्योगवाढीचे केंद्र

पायाभूत सुविधांमुळे पुणे उद्योगवाढीचे केंद्र

Published on

पुणे, ता. ९ ः पुण्यासह राज्यात सातत्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. चाकण आणि हिंजवडी या भागात उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या अनुषंगाने बदल होत आहेत. पुणे उद्योगवाढीचे केंद्र बनत आहे. शहरात वाढत असलेले ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) ही एक संधी आहे, त्याबाबत सर्वांनी मिळून काम केले, तर पुणे अधिक चांगले होईल, असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ॲग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) मंगळवारी (ता. ९) ‘जीसीसी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या ‘एमसीसीआयए’च्या कार्यालयात ही परिषद पार पडली. यात विविध विषयांवरील चर्चासत्रांमधून २० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. वेलरासू, महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी उद्घघाटनाच्या सत्रात सहभाग घेतला. ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.

‘जीसीसी’चे सर्वात मोठे केंद्र बनण्याची ताकद राज्यात आहे. येत्या पाच वर्षांत राज्यात आणखी ४०० नवे क्षमता केंद्र उभारण्याचे नियोजन असून, राज्य यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारत आहे. राज्य सेवा क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील ६४ टक्के वाटा, दरवर्षी तयार होणारे सुमारे पाच लाख पदवीधर, परवडणारी कार्यालयीन जागा आणि व्यवसायसुलभतेतील आघाडीमुळे महाराष्ट्र ‘जीसीसी’साठी सर्वात योग्य राज्य आहे. भारत २०४७ पर्यंत तीस लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवत असून, त्यातील पाच लाख कोटी डॉलरचा वाटा महाराष्ट्रातून येणार असल्याची अपेक्षा वेलरासू यांनी व्यक्त केली.
------------------
पुणे राज्याच्या वाढीच्या आराखड्यात सर्वाधिक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. पुढील दीड वर्षांत पुण्यातील दळणवळण
व्यवस्थेत प्रचंड बदल दिसतील. पायाभूत सुविधांवर कुठेही तडजोड होऊ शकत नाही. पुण्याला देशातील ‘जीसीसी’ राजधानी बनवायचे असेल, तर सरकार आणि जनता या दोघांनीही एकत्र काम करणे आवश्यक आहे
- कौस्तुभ धवसे, गुंतवणूक व धोरण सल्लागार
-----------
देशातील एकूण ‘जीसीसी’पैकी २४ ते २५ टक्के म्हणजे सुमारे ४०० केंद्रे पुण्यात आहेत. पुणे मोठ्या उद्योगवाढीचे केंद्र बनत आहे. येथे पंचवीस वर्षांपूर्वीही योग्य वातावरण तयार केले म्हणून आयटी क्षेत्र वाढले. आजही कौशल्य उपलब्धता, परवडणारी घरे, कार्यालयीन जागा आणि अनुकूल वातावरण ही पुण्याची बलस्थाने आहेत.
-नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
-----------------
‘जीसीसी’ केवळ पुणे- मुंबईपुरते मर्यादित नकोत
‘जीसीसी’ केवळ मुंबई–पुण्यापुरते मर्यादित न ठेवता ते नागपूर, नाशिकसारख्या शहरांतही विस्तारली जातील. तंत्रज्ञान आणि बँकिंग-वित्तीय क्षेत्रापलीकडे इतर उद्योगांनाही आकर्षित करण्यासाठी धोरणे राबवली जात आहेत. विद्युत वाहन पायाभूत धोरण, बांबू उद्योग धोरण यांसारख्या उपक्रमांचा यात मोठा वाटा आहे,
‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. वेलरासू यांनी नमूद केले.
--------------------
‘जीसीसी’ असलेल्या ठिकाणीच कोंडी
शहरातील ३२ रस्त्यांवर ८० टक्के वाहतूक होते. विमाननगर, खराडी, हडपसर येथे शहरातील सर्वाधिक ‘जीसीसी’ असून, येथेच वाहतूक कोंडी होत असल्याची कबुली राम यांनी दिली. प्रभावी उपाययोजनांमुळे ३०-३५ टक्के कोंडी कमी झाली आहे. पुण्यात ७०० किलोमीटरचे विकास आराखड्यातील रस्ते प्रस्तावित असून, लवकरच यातील दहा रस्ते पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com