‘सवाई’ सादरीकरणांनी अभिजात स्वरयज्ञाची नांदी

‘सवाई’ सादरीकरणांनी अभिजात स्वरयज्ञाची नांदी

Published on

पुणे, ता. १० : सनईचे मंगल सूर, दुसऱ्या सत्रात रंगलेला राग भीमवंती, मिश्रा बंधूंचे सहगायन, भारतीय चेलो-सतार सहवादन आणि पं. उल्हास कशाळकर यांनी रंगवलेला ‘राग हमीर’, अशा ‘सवाई’ सादरीकरणांनी अभिजात स्वरयज्ञाची बुधवारी नांदी झाली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ७१ व्या पर्वाला लोकेश आनंद यांच्या सनईवादनाने सुरुवात झाली. त्यांनी राग मुलतानी सादर केला. त्यानंतर गुरू पं. जसराज यांची ‘आये मोरे साजनवा’ ही रचना आणि बनारसी धून पेश केली. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार आणि सनई सहवादनासाठी केदार जाधव यांनी साथसंगत केली.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक यांनी पहिल्या दिवसाचे दुसरे स्वरपुष्प गुंफले. त्यांनी राग भीमवंती सादर केला. त्यांनी राग मांजखमाजमधील ‘बलमा नें चुराई निंदिया’ हा दादरा पेश केला. त्यांनी सादर केलेल्या सर्व रचना विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांच्याच होत्या. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार, संवादिनीवर अमेय बिच्चू आणि तानपुऱ्यावर फुमी नेगिशी व पल्लवी कुलकर्णी-घोडके यांनी साथसंगत केली.
तिसऱ्या सत्रात पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र- शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन झाले. त्यांनी राग श्री प्रस्तुत केला. ‘जगत में झूठी देखी प्रीत’ ही गुरूनानकांची रचना गाऊन मिश्रा बंधूंनी सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. अरविंदकुमार आझाद, संवादिनीवर अमेय बिच्चू आणि तानपुऱ्यावर अक्षय जोशी व निषाद व्यास यांनी साथसंगत केली.
चौथ्या सत्रात पं. रविशंकर यांचे शिष्य पं. शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सास्किया राव-दे-हास यांच्या सतार व चेलो अशा सहवादनाने रसिकांना खिळवून ठेवले. ‘‘मी या महोत्सवात १९८१ मध्ये गुरुजी पं. रविशंकर यांच्यासोबत तानपुऱ्यावर साथ केली होती. तेव्हा तबल्याची साथ उस्ताद झाकीर हुसैन यांनी केली होती. त्या अविस्मरणीय वादनाचे मला आजही स्मरण आहे’’, असे सांगत पं. शुभेंद्र राव यांनी वादनाला प्रारंभ केला. या कलाकार दांपत्याने राग हेमंत सादर केला. भारतीय चेलो या वाद्याचे नादवैविध्य आणि त्यासह सतारीचे सूर असा अनोखा श्रवणानुभव रसिकांना मिळाला. ‘एकला चलो रे’ ही धून एकत्रित सादर करत त्यांनी सांगता केली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर साथसंगत केली.
पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाला. पं. कशाळकर यांनी राग हमीर पेश केला. त्यानंतर ‘राग अडाणा’मधील रचनांचे सादरीकरण केले. ‘जमुना के तीर’ या भैरवीने त्यांनी समारोप केला. त्यांना तबल्यावर तालयोगी पं. सुरेश तळवलकर, संवादिनीवर सुधीर नायक आणि तानपुऱ्यावर निर्भय सक्सेना, अद्वैत केसकर, सई महाशब्दे यांनी साथ केली.

भारतीय रागसंगीताचा ‘विदेशी’ दरवळ
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताने आजवर अनेक विदेशी कलाकारांना मोहिनी घातली आहे. या अभिजात संगीताच्या सामर्थ्याने अशा कलाकारांना भारतभूमीकडे खेचून आणले आहे. अशाच दोन कलाकारांच्या सादरीकरणाने बुधवारी ‘सवाई’च्या मंचावर बहुसांस्कृतिकतेचे दर्शन घडले. विदुषी सास्किया राव दे-हास आणि फुमी नेगिशी यांच्यामुळे भारतीय रागसंगीताचा ‘विदेशी’ दरवळ रसिकांनी अनुभवला. मूळच्या नेदरलँड्सच्या असलेल्या सास्किया यांनी ‘भारतीय चेलो’ या वा‌द्याची निर्मिती करून त्यांनी पूर्व व पश्चिम संगीत परंपरांमध्ये नवे पूल बांधले आहेत. त्यांनी पती पं. शुभेंद्र राव यांच्यासह सतार व चेलो सहवादन सादर केले. तर फुमी नेगिशी यांनी दुसऱ्‍या सत्रात डॉ. चेतना पाठक यांच्या गायनाला तानपुऱ्यावर साथसंगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com