सनई, चेलो-सतार जुगलबंदी अन् गायनाने भरला रंग
- सायली पानसे-शेल्लेकरी
कला, साहित्य आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक महोत्सव होत असले, तरी आर्य प्रसारक मंडळ यांच्या वतीने दरवर्षी सादर होणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्याची ‘शान’ आहे. विश्वविख्यात, ज्येष्ठ तसेच नव्या जोशाचे तयार कलाकार ऐकण्याची संधी या महोत्सवातून रसिकांना दरवर्षी मिळत असते. या वर्षीच्या ७१व्या महोत्सवाची सुरुवात लोकेश आनंद यांच्या अत्यंत सुरेल सनईवादनाने झाली. त्यांच्या वादनातून ‘मुलतानी’ राग खुलत गेला. तसा सवाईचा मांडव संगीतप्रेमींनी भरू लागला. केदार जाधव यांचे सहवादन त्यांना लाभले. लोकेश यांना सनईच्या जोडीने कंठ संगीताचा अभ्यास असल्याने त्यांचे वादन गायकी अंगाने खुलत गेले. पहिल्या रागानंतर सादर झालेल्या बनारसी धूनवर पांडुरंग पवार यांच्या तबलासाथीने विशेष रंग भरला.
दुपारच्या सत्रात साधारणपणे ठरावीक रागच गायले, वाजविले जात असतात. या पार्श्वभूमीवर किराणा घराण्याच्या डॉ. चेतना पाठक यांनी आपल्या गुरू स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांची निर्मिती असलेला ‘भीमवंती’ या रागाची निवड केली. प्रामुख्याने मधुवंती आणि भीमपलासची झलक अशा या जोडरागाचे स्वरूप आहे. गुरुमुखी परंपरेत विशेषतः कंठसंगीत शिकल्यावर गुरू आणि शिष्यामध्ये अनेक गोष्टींत साम्य दिसून येते, तसे यांच्याबाबतीत जाणवले. डॉ. पाठक यांनी पहिल्या रागानंतर ‘मांज खमाज’ रागात ‘दादरा’ पेश केला. त्यांनी सादर केलेल्या सर्व रचना प्रभाताईंच्या होत्या. शास्त्रीय संगीताची धुरा ही आश्वासक तरुण पिढी अत्यंत तयारीने पेलत आहे हे हार्मोनिअमवर अमेय बिच्चू व तबल्यावर परत एकदा पांडुरंग पवार यांनी दाखवून दिले.
सायंकाळचा प्रहर सुरू झाल्यावर ‘श्री’ रागाचे स्वर आळवत रसिकांना आनंद दिला बनारस घराण्याच्या रितेश आणि रजनीश मिश्रा यांनी. ज्येष्ठ गायक पं. राजन मिश्रा यांचे ते सुपुत्र आहेत. भारदस्त आवाज, मिंडयुक्त गायकी, सरगम, आलाप ताना आणि एकमेकांच्या सांगीतिक विचारांना चालना देत दोघांनी सहगायन प्रस्तुत केले. ‘श्री’ रागातले प्रकार ऐकवत त्यांनी ‘पुरिया धनश्री’ रागातल्या भजनाने गायन सेवा संपन्न केली. त्यांना ९९ वर्षांच्या माउली टाकळकर यांची टाळसाथ लाभली.
रियाजाने आवाज कमवावा लागतो तसा वादानातला गोडवादेखील डोळस रियाजनेच येतो. असाच सिद्धहस्त कलाकार म्हणजे पं. अरविंदकुमार आझाद. मिश्रा यांच्या जुगलबंदीला आझादजींच्या साथीमुळे अधिक रंग भरले. याही वर्षी पाश्चात्त्य वाद्यांवर भारतीय संगीत ऐकायची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली. वायलीनच्या परिवारातले चेलो आणि सतार या वाद्यांच्या जुगलबंदीने सायंकाळच्या सत्रात विशेष रंगत आणली. पं. शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सासकिया राव-दे-हास यांचे सहवादन झाले. मूळच्या नेदरलँड्सच्या सासकिया यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे तालीम घेतलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘भारतीय चेलो’ या वाद्याची निर्मिती करून हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य संगीताचा मेळ घातला आहे. मुळात चेलो हे खूप मोठे वाद्य आहे, पण त्यांनी भारतीय संगीताला अनुसरून वाद्याचा आकार लहान केला. अतिशय गंभीर, खोल आणि भारदस्त आवाजातला चेलो आणि नाजूक आवाजातली सतार या परस्परविरोधी साउंडमुळे दोन्ही वाद्यांचा परिणामाने रसिक भारावून गेले. त्यांनी सादरीकरणासाठी ‘हेमंत’ रागाची निवड केली होती. पं. रामदास पळसुले यांनी तबला कुठेही वरचढ होऊ न देता संयत साथ केली. पं. रविशंकरांनी कर्नाटक संगीतातला ‘सीमेंद्र मध्यम’ हा राग हिंदुस्थानी संगीतात प्रचलित केला. याच रागात विलंबित तीनताल व द्रुत एकतालात गत सादर झाली व ‘एकला चलो रे’ ही धून सादर करून वादनाचा समारोप झाला.
ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. तबल्यावर तालयोगी पं. सुरेश तळवळकर यांची साथ लाभल्याने त्यांचे सादरीकरण वेगळ्याच उंचीवर जाते, याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला. त्यांनी ‘हमीर’ रागाने गायनाची सुरुवात केली. ‘चमेली फूली चंपा’ या प्रसिद्ध बंदिशीत, झूमरा तालात लयीच्या अंगाने, बोल-आलाप करत त्यांनी रागाचे भावविश्व तयार केले. अतिशय सुरेल, आसयुक्त तबल्याचा नाद रागाला पोषक असा होता. सुधीर नायक यांची हार्मोनिअम संगत त्यांच्या सांगीतिक विचारांना पोषक होती. उल्हासदादा उत्तम शिष्य घडवत आहेत याची प्रचिती निर्भय सक्सेना, साई महाशब्दे व अद्वैत केसकर यांच्या स्वरसाथीतून येत होती. पहिल्या रागानंतर त्यांनी ‘अडाणा’ रागात दोन बंदिशी ऐकवल्या. शेवटचे सादरीकरण असल्याने वेळेची मर्यादा पाळावी लागते आणि म्हणूनच त्यांनी दोन्ही राग चंचल प्रकृतीचे निवडले असावेत. त्यानंतर ‘नट बिहाग’ रागात दोन बंदिशी सादर करून, लोकग्रहास्त्व ‘जमुना के तीर’ या भैरवीने त्यांनी आपल्या गायनाची सांगता करत श्रोत्यांना श्रवणानंद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

