समतेच्या वाटेवर चालण्याचा संकल्प
डॉ. बाबा आढाव यांना शेकडो कार्यकर्त्यांसह मान्यवरांची श्रद्धांजली

समतेच्या वाटेवर चालण्याचा संकल्प डॉ. बाबा आढाव यांना शेकडो कार्यकर्त्यांसह मान्यवरांची श्रद्धांजली

Published on

पुणे, ता. १२ : कायम सत्याची कास धरत समतेच्या वाटेने कष्टकरी, असंघटित कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांचे संवर्धन करणे, त्यांनी दाखविलेल्या वाटेवर आयुष्यभर चालण्याचा संकल्प करत शेकडो कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी बाबांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. बाबा आढाव यांची श्रद्धांजली सभा शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात झाली. बाबांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याविषयी दाटून आलेल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून कष्टकरी, कामगार, विविध संघटनांचे कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी आले होते. ‘सत्य धर्म जपणारे ‘बाबा...’, ‘समाजातील खरा सत्यशोधक,’ ‘वडिलांच्या स्थानी असणारे बाबा...’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. बाबा आढाव यांच्या पत्नी शीला आणि मुलगा असीम यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार उल्हास पवार, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, शारदा वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले,‘‘सोनचाफ्याची फुलं म्हणजे बाबा आहेत. हा चाफ्याचा म्हणजे बाबाच्या कार्याचा सुगंध कार्यकर्त्यांना चळवळ करण्याची प्रेरणा देईल. कार्यकर्ते म्हणून त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलायला हवे. त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी शपथ घ्यायला हवी. विषमता निर्मूलन शिबिर ही त्यांची मूळधारणा होती. अखंडपणे समतेची वाट धरलेले बाबा आपल्यामध्ये जिवंत आहेत.’’ उल्हास पवार म्हणाले,‘‘समाजात दोन प्रकारचे समाजसेवक असतात, एक बोलणारे आणि एक कृती करणारे. डॉ. बाबा आढाव हे कृतिशील समाजसेवक होते. त्यांच्या कार्याची ख्याती महाराष्ट्रासह केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोचली होती. त्यांच्या वाटेवर चालणे तितके सोपे नाही, परंतु आपण त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करायला हवा.’’
‘‘आपल्यात बाबा नाहीत, म्हणून सर्व काही संपणार, असे होणार नाही. हजारो कार्यकर्ते त्यांची परंपरा कायम चालू ठेवतील. त्यांची धगधगती मशाल अखंडपणे पेटत राहील,’’ असे सांगत असीम यांनी बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले,‘‘समतेच्या वाटेवर जाणाऱ्या बाबांचा आदर्श समोर ठेवून, कार्यकर्त्यांनी वाटचाल करत राहणे महत्त्वाचे ठरेल.’’
अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क समितीचे प्रा. शरद जावडेकर म्हणाले,‘‘बाबांनी अनेक चळवळी निर्माण केल्या. पण, त्यांना शिक्षणाबद्दल विशेष आस्था होती. विज्ञाननिष्ठ आणि समतेवर आधारित दृष्टिकोनातून शिक्षणाकडे त्यांनी कायम पाहिले.’’
यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू, शारदा वाडेकर, शशिकांत शिंदे, संजय बनसोडे, विकास मगदूम आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नितीन पवार यांनी सूत्रसंचालन केले.

16947

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com