कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अन् अस्वस्थताही महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मुलाखती घेण्यास प्रारंभ भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु
पुणे, ता. १३ ः पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपमध्ये प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुक आहेत. त्यातील योग्य उमेदवार शोधण्यासाठी आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरवात झाली आहे. काहींच्या मुलाखती एका मिनिटात उरकल्या तर काहींची पाच मिनिटापर्यंत मुलाखत झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होताच, पण उमेदवारी मिळणार की नाही, या विचाराने अस्वस्थताही दिसून आली. या मुलाखतीसाठी शहर कार्यालयाबाहेर दिवसभर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेतले आहेत. त्यांच्या आज मुलाखती शहर कार्यालयात पार पडल्या. शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आज दिवसभरात प्रभाग क्रमांक १ ते २० यामधील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.
सकाळपासून मुलाखतीला सुरवात झाल्यानंतर शहर कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने वेळ वाया न जाऊ देता या चारही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे प्रभागनिहाय मुलाखती चालू केल्या. मुलाखतीला जाण्यासाठीही मोठी रांग कार्यालयात लागली होती. एकाच प्रभागातील इच्छुक एकमेकांच्या समोर आल्याने काहीसे वेगळे वातावरण याठिकाणी पाहायला मिळाले.
मुलाखतीमध्ये पक्षाचे किती वर्षापासून काम करत आहेत, संघटनात्मक जबाबदारी काय पार पाडली आहे, सामाजिक क्षेत्रात काय काम केले आहे, शिक्षण, व्यवसाय याची माहिती इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आली. अनेक इच्छुकांनी मुलाखतीमध्ये कार्य अहवाल सादर केल्याने मुलाखत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सोय केली. त्याचप्रमाणे इच्छुकांनी त्यांच्या जमेच्या बाजू मुलाखतीत मांडल्या, तर
त्यांच्या कमकुवतपणाबद्दल विचारल्यानंतर अनेकांची चांगलीच धांदल उडाली.
प्रवेश लांबल्याने मुलाखतही लांबली
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यासह अन्य पक्षातून काही इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण गेल्या आठवड्यात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षप्रवेशावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाले. त्याचे पडसाद उमटल्याने पक्ष प्रवेश लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे अशा इच्छुकांच्या मुलाखती या स्वतंत्रपणे गुपचूप पार पाडल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, संभावित प्रवेश हे ज्या प्रभागात होणार आहेत, तेथील कार्यकर्त्यांमध्ये आज अस्वस्थता दिसून येत होती.
‘‘आज दिवसभरात प्रभाग क्रमांक १ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. उद्या प्रभाग क्रमांक २१ ते ४१मधील इच्छुकांच्या मुलाखती पार पाडल्या जाणार आहेत. या मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.’’
- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

