वसतिगृहात कीटक, उंदीर व भटके प्राणीही निवासी डॉक्टरांसाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजव्यवस्थाही निकृष्ट
पुणे, ता. १३ : सभोवती कीटक, उंदीर व भटके प्राण्यांचा वावर, स्वच्छतेचा अभाव तसेच पाणीपुरवठा विस्कळित आहे अन वीजव्यवस्थाही पुरेशी नाही. हे पाहून वाटेल की हे दृष्य कुठल्यातरी खेडेगाव, आदिवासी पाड्यातील किंवा दुर्गम भागातील असेल. मात्र, हे दृष्य आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या निवासी डॉक्टर राहत असलेल्या वसतिगृहातील.
राज्यातील १८ नामांकित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधून शिक्षण घेत असलेल्या ५ हजार ८०० निवासी डॉक्टरांनीच त्यांच्या वसतिगृहांची ही बिकट अवस्था मांडत या समस्येला वाचा फोडली आहे. तसेच, त्यांना किमान सोयी सुविधा मिळाव्यात, अशी मागणी शासन दरबारी केली आहे. हेच नव्हे तर अपुऱ्या सोयी-सुविधा, मानधन वेळेवर न मिळणे, सरकारी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नसणे या कारणांमुळे निवासी डॉक्टरांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने म्हटले आहे.
या सर्वेक्षणानुसार जवळपास ५० टक्के निवासी डॉक्टरांना वसतिगृहच उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना असुरक्षित ठिकाणी राहावे लागते. राज्यातील एक तृतीयांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० तारखेपर्यंत मानधन मिळत नाही. त्यामुळे, उधारी, उसनवारी करत जगावे लागते. इतकेच नव्हे तर ११ टक्के डॉक्टरांना पूर्ण असुरक्षित वाटते. याबाबत निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी ‘मार्ड’तर्फे वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून आश्वासन देण्यात येते, मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी ५० टक्के महाविद्यालयांमध्ये तक्रारी दाखल केल्यानंतरही कारवाई झाली नाही. सुरक्षेत वाढ करणे, मानधनामध्ये सुधारणा करणे, वसतिगृहांची दुरुस्ती करणे या प्रकारची आश्वासने वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली होती, पण ते पूर्ण झाले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये सरासरी २५ टक्के सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता, आपत्कालीन विभाग, ओपीडी, वसतिगृहांमध्ये सुरक्षा नाही, सुमारे ५० टक्के महाविद्यालयांत मेस सुविधा बंद किंवा निकृष्ट, पुरुष-महिला निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचा अभाव व आठवड्याला ८० तासांहून अधिक काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
---
नव्वद दिवसांच्या आत प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांत २०० सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, सर्व निवासी डॉक्टरांना वसतिगृह मिळावे, वेळेवर मानधन मिळावे, डॉक्टरांना विलासी जीवन नको असून, किमान सुविधा तरी असाव्यात. तक्रारींवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या आहेत. निवासी डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

