‘बायोमायनिंग’चे काम प्रतिटन ५५० रुपयांत? ठेकेदारांबरोबर महापालिकेची चर्चा सुरू - स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव जाण्याची शक्यता
पुणे, ता. १३ ः फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) कमी दराने करण्यास ज्या ठेकेदारांनी प्रक्रिया शुल्कासाठी प्रति टन ७२५ रुपयांपेक्षा जास्त दर भरला होता, ते ठेकेदार आता प्रति टन ५५० रुपयांनी करण्यास तयार होत आहेत. त्यांच्यासोबत महापालिका प्रशासनाची चर्चा सुरु असून, सोमवारपर्यंत सर्व ठेकेदार अंतिम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायी समितीची बैठक होणार असून, त्यात या सर्व निविदा मान्य केली जाण्याची शक्यता आहे.
कचरा डेपोमध्ये २८ लाख टन कचरा पडून आहे. या कचऱ्याची २०२७ पर्यंत विल्हेवाट लावण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेले आहेत. त्यासाठी महापालिकेने प्रत्येकी ५.६० लाख टनाच्या पाच निविदा काढल्या होत्या. या निविदेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला होता. शुक्रवारी (ता. १२) महापालिकेने आर्थिक विषयक ‘ब’ पाकिट उघडल्यानंतर या कामासाठी प्रक्रिया शुल्कासाठी प्रति टन ५५० रुपये इतका सर्वात कमी दर आला आहे. निविदेतील अटी शर्तीनुसार जो दर सर्वात कमी असेल, त्याच दराने पाचही निविदांचे काम ठेकेदारांना करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पॅकेज दोनमध्ये ५५० रुपये प्रति टन प्रक्रिया शुल्क आले आहे.
महापालिका प्रशासनाने ठेकेदारांसोबत आज चर्चा केली. त्यामध्ये पॅकेज एक, दोन, तीन आणि चार या चार निविदांसाठी प्रक्रिया शुल्क ५५० रुपये प्रति टन या दराने काम करण्यास ठेकेदारांनी तयारी दाखवली आहे. पॅकेज पाचमध्येही लवकरच तोडगा निघेल, असे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.
खोडा घालण्याचा प्रयत्न
बायोमायनिंगचे काम प्रति टन ५५० रुपये इतक्या कमी दराने करणे शक्य नाही, असे ठेकेदरांनी सांगतिले. पण या दराने काम करण्यासाठी काही ठेकेदार तयार झाले. प्रशासनासोबत बोलणी सुरु असताना काही उपद्रवी मंडळींनी ठेकेदारांना फोन करून तुम्ही कमी दराने काम करण्यास तयार होऊ नका. या निविदा रद्द करायला लावून, फेरनिविदा निघेल यासाठी प्रयत्न करा, असा दबाव टाकून या प्रक्रियेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यास यश आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

