वेणुनादाची किमया अन् विदुषींच्या ‘चारूकेशी’चे गारूड
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ः सिद्धार्थ बेलमण्णु यांचे पदार्पणातील आश्वासक सादरीकरण

वेणुनादाची किमया अन् विदुषींच्या ‘चारूकेशी’चे गारूड सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ः सिद्धार्थ बेलमण्णु यांचे पदार्पणातील आश्वासक सादरीकरण

Published on

पुणे, ता. १३ ः अनुराधा कुबेर यांनी रंगवलेला ‘मुलतानी’, पं. रूपक कुलकर्णी यांच्या वेणुनादाची किमया आणि मेघरंजनी मेधी यांचा भावरसपूर्ण कथक नृत्याविष्कार, अशा बहारदार सादरीकरणांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा चौथा दिवस रंगला. युवा गायक सिद्धार्थ बेलमण्णु यांचे पदार्पणातीलच आश्वासक सादरीकरण, हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. विदुषी कला रामनाथ आणि विदुषी डॉ. जयंती कुमरेश यांनी व्हायोलिन व सरस्वतीवीणेच्या सहवादनात रंगवलेल्या ‘राग चारूकेशी’ने रसिकांवर गारूड केले.
महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरवात सिद्धार्थ बेलमण्णु या युवा गायकाच्या आश्वासक सादरीकरणाने झाली. ‘सवाई’च्या स्वरमंचावरील पहिल्याच प्रस्तुतीत सिद्धार्थ यांनी जाणकारांची दाद मिळवली. राग भीमपलास सादर करताना ‘अब तो बडी बेर भयी’ आणि ‘जा जा रे अपने मंदिरवा’ या बंदिशी त्यांनी पेश केल्या. ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग आणि संत राघवेंद्र स्वामी यांची कन्नड भक्तीरचना सादर करून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी सांगता केली. त्यांना तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर सुयोग कुंडलकर, टाळासाठी माऊली टाकळकर आणि तानपुऱ्यावर वैशाली कुबेर व अनुजा भावे -क्षीरसागर यांनी साथ केली.
यानंतर भेंडीबाजार घराण्याच्या गायिका अनुराधा कुबेर यांनी मुलतानी राग सादर केला. विलंबित एकतालातील ‘कैसे कर मन समझाऊ’ ही डॉ. चैतन्य कुंटे यांची रचना, त्याला जोडून डॉ. अरविंद थत्ते यांनी बांधलेला तराणा त्यांनी पेश केला. प्रतापवराळी या दाक्षिणात्य रागातील ‘बरन साजन सखी’ या रचनेनंतर दुर्गा रागातील द्रुत एकतालात बांधलेला त्रिवट सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर आणि तानपुऱ्यावर ओवी तेंडुलकर व मृद्गंधा कड यांनी साथ केली.
सायंकाळचे सत्र पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने रंगले. त्यांनी राग शुद्ध कल्याण सादर केला. ईशान घोष यांच्या तबलासाथीने त्यांनी मैफील रंगवली. तबल्यासह बासरीचे सवालजवाबांनाही रसिकांची भरभरून दाद मिळाली. सिंदुरा रागातील रचनेने कुलकर्णी यांनी समारोप केला. त्यांना जयकिशन हिंगु यांनी बासरीची साथ केली.
----
सहवादनाने भरले रंग
महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पाचव्या सत्रात विदुषी कला रामनाथ आणि विदुषी डॉ. जयंती कुमरेश यांच्या व्हायोलिन व सरस्वतीवीणेच्या सहवादनाने रंग भरले. या विदुषींना रंगवलेल्या राग ‘चारूकेशी’ने रसिकांवर गारूड केले. व्हायोलिन व सरस्वतीवीणेसह योगेश समसी यांचे तबलावादन आणि जयचंद्र राव यांच्या पखवाजवादनानाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कबीर शिरपूरकर आणि सावनी जोशी यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली.
----
हस्तलिखित पत्राच्या संकल्पनेला प्रतिसाद
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा पोस्टकार्ड लेखनाच्या अभिनव संकल्पनेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवसांतच एक हजारांहून अधिक पत्रे पत्रपेटीत जमा झाली आहेत. महोत्सवात श्रोत्यांसाठी मोफत पोस्टकार्ड्स आणि पत्रपेटी ठेवण्यात आली असून पत्ता व पिनकोड लिहून ते पत्रपेटीत टाकल्यास, योग्य स्टँप लावून ते पत्र पोहोचवण्याची जबाबदारी आयोजकांनी स्वीकारली आहे.
----
मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती
महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी पं. रूपक कुलकर्णी यांच्या सत्रावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा कार्यक्रम लवकरच दिल्लीत आयोजित करण्याचा मानस मोहोळ यांनी व्यक्त केल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
----
आज (ता. १४) महोत्सवात ः
(वेळ दुपारी १२ ते रात्री १०)
पं. उपेंद्र भट - गायन

श्रुती विश्वकर्मा-मराठे - गायन
अनिरुद्ध ऐताळ - गायन
सावनी शेंडे - गायन
डॉ. एल. शंकर - व्हायोलिन वादन
पं. व्यंकटेश कुमार - गायन
पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे आणि विराज जोशी : ‘अर्घ्य’(सहगायन)
फोटोः 76189, 76190, 76192

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com