‘फोक आख्याना’तून लोकपंरपरेचा जागर
पुणे, ता. १४ ः महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला-लोकपरंपरेचा जागर आणि त्याला मिळालेली आधुनिकतेची झळाळी रसिकांनी अनुभवली. ‘द फोक आख्यान’च्या या खेळात रसिक रंगले होते. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चौथा खेळही हाउसफुल्ल झाला.
‘सकाळ’च्या वतीने शनिवारी (ता. १३) ‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ‘क्रेझी चीजी कॅफे’ हे सहयोगी प्रायोजक होते, तर ‘तिकीट खिडकी’हे ‘तिकीटिंग पार्टनर’होते. याप्रसंगी क्रेझी चीजी कॅफेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार केळकर, कार्यक्रमाचे निर्माते रणजित गुगळे उपस्थित होते.
‘थाट ह्यो जुना, खेळ हा नवा’ अशा संकल्पनेसह मराठी मातीतील लोककला अन् लोकसंगीताचे अगदी नव्या आणि आगळ्यावेगळ्या ढंगात उत्साहपूर्ण वातावरणात सादरीकरण झाले आणि त्याला रसिकांनी क्षणाक्षणाला टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. मराठमोळ्या संस्कृतीतील भक्तिगीत, घाटोळी, जात्यावरच गाणे, वाघ्या-मुरळी यांच्या जागरणातील भक्तिभाव, लावणीतील अध्यात्म, सुंबरान अशा एका पाठोपाठ एक नऊ माळा गुंफत कलाकारांनी लोकसंगीतातील सर्व पैलूंमध्ये रसिकांना गुंतवले.
उत्तरार्धात पारंपरिक वाद्यांच्या वादनाने रंग भरला. ढोलकी, तुणतुणे, झांज, हलगी, संबळ, टाळ, बासरी यांसह अनेक विस्मरणात गेलेली वाद्य या कलाकारांनी आख्यानातून पुढे आणली. तरुण कलाकारांनी लोकपरंपरेतून आलेल्या कथा, गाणी आणि लोकभावना नव्या पिढीसमोर आपल्या दमदार सादरीकरणातून ठसवून सांगितल्या. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन ईश्वर अंधारे यांचे होते. संगीतकार हर्ष-विजय यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गीते सादर केली. ‘सकाळ’चे मुख्य विपणन अधिकारी रूपेश मुतालिक यांच्या हस्ते कलाकार आणि प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
