पुणे- सोलापूर रेल्वे प्रवास १६० किमी वेगाने होणार ‘स्कॉट ट्रान्सफॉर्म’चे काम झाल्यानंतर प्रवाशांची ३०मिनिटे वाचणार
प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ ः पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्या आता ताशी १६० किलोमीटर वेगाने धावतील, कारण मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे- सोलापूर-वाडी स्थानकादरम्यान ट्रॅक अपग्रेडेशनसह स्कॉट ट्रान्सफॉर्मचे (३ फेजमधून वीज संतुलित पद्धतीने २ फेजमध्ये बदलणे) काम हाती घेतले आहे. यामुळे रेल्वे गाड्यांना होणारा विद्युतपुरवठा हा अधिक क्षमतेचा होईल. वीजगळतीचीदेखील समस्या राहणार नाही. सध्या या मार्गावर रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावत आहेत. गती वाढल्यानंतर पुणे- सोलापूर रेल्वे प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
सोलापूर रेल्वे स्थानक हे देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावर विविध विभागाच्या अंतर्गत स्कॉट ट्रान्सफॉर्मचे काम सुरू झाले आहे. लोणावळा ते पुणे व पुणे ते सोलापूर व सोलापूर ते वाडी या दरम्यान काम होणार आहे. या मार्गावर असलेल्या ट्रॅक्शन सब-स्टेशनच्या जवळ ‘स्कॉट ट्रान्सफॉर्मर’ बसविले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई)मधून विद्युत पुरवठ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी वायर बदलण्याची गरज राहणार नाही. ३ फेजमधून होणारा वीजपुरवठा दोन फेजमधून होईल. परिणामी, वीज गळती होणार नाही. शिवाय, उपलब्ध विजेचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने होईल. परिणामी, रेल्वेगाड्या अधिक गतीने धावतील.
-------------------------
गती कशी वाढणार
- ‘स्कॉट ट्रान्सफॉर्मर’मुळे ग्रीडवर निर्माण होणारा असंतुलित भार कमी होतो. यामुळे राष्ट्रीय वीज ग्रीडची स्थिरता टिकून राहते, जो ऊर्जेच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा घटक आहे.
- या प्रणालीमध्ये विजेचा उच्च दाब वापरत असल्याने लांब अंतरावरही वीजगळती (व्होल्टेज ड्रॉप) होत नाही. यामुळे रेल्वे इंजिनांना सतत आणि स्थिर वीज मिळते. पूर्ण क्षमतेने वापर शक्य.
- इंजिनला स्थिर आणि उच्च दाबाची वीज मिळाल्याने, रेल्वे इंजिन कमी वेळेत वेग पकडू शकते आणि जास्त वेगाने धावू शकते. यामुळे रेल्वेच्या सरासरी गतीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
- एकाच वेळी एकाच मार्गावर जास्त गाड्यांना प्रभावीपणे वीजपुरवठा करता येतो. परिणामी, गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होते.
------------------------------
गती वाढविण्याचे आणखी प्रयत्न :
- रेल्वे प्रशासन देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर गाड्यांची गती वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे.
- गाड्यांची गती वाढविण्यासाठी केवळ इंजिनची क्षमता वाढवून चालणार नाही, त्यामुळे रेल्वे अन्य बाबीवरदेखील काम करीत आहे.
-रुळांची क्षमता वाढविणे, पूर्वी रूळ ५२ किलो वजनाचे होते. आता ६० किलो वजनाच्या रुळाचा वापर सुरू आहे.
- सिग्नल प्रणालीत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा वापर आदी.
---------------
‘‘रेल्वे गाड्यांना होणारा विजेचा पुरवठा वाढविण्यासाठी ‘स्कॉट ट्रान्सफॉर्म’ या प्रणालीचा वापर होतो. पुणे - सोलापूर व वाडी स्थानकादरम्यान ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम सुरू झाले. येत्या एक ते दीड वर्षात याचे काम पूर्ण होईल. ट्रॅक्शन सब-स्टेशनच्या जवळ ‘स्कॉट ट्रान्सफॉर्म’ बसविले जाईल. यामुळे वीजगळती होणार नाही.
- ग्यानेंद्र सिंह, उप मुख्य विद्युत अभियंता, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

