मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात

मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात

Published on

पुणे, ता. १४ : शहराच्या विकासाला हातभार लावणाऱ्या सुमारे ३ हजार ६३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्‍घाटन व अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. १५) होणार आहे. यामध्‍ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास, आरोग्य, शालेय शिक्षण, सुशासन या विभागातील विकासकामांचा समावेश आहे. यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होईल, असा विश्वास पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
अमृत २.० योजनेअंतर्गत वडगाव बुद्रुक येथे प्रतिदिन १२५ दशलक्ष लिटर क्षमतेचा (एमएलडी) जलशुद्धीकरण प्रकल्प, यामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १७ टाक्यांचे लोकार्पण, कात्रज आणि पाषाण येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची लोहगाव येथील नवी इमारत, चांदणी चौक-बाणेर-खराडी येथील नवी अग्निशमन केंद्रे यांचा समावेश आहे. त्‍याचबरोबर समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेवाळेवाडी आणि केशवनगर विभागातील विविध कामे, मलनिःसारण वाहिन्यांची कामे, सिंहगड रस्त्यावरील आपत्ती व्यवस्थापनासाठीचे बहुविध यंत्रणा नियंत्रण व समन्‍वय केंद्र, महानगरपालिकेचे विविध दवाखाने, दिव्यांग उपचार केंद्र यांच्यासह महानगरपालिकेच्या काही डिजिटल उपक्रमांचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुरू असलेल्या बहुस्तरीय उड्डाणपुलाला सेनापती बापट रस्त्याकडून जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. तसेच शहरातील सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा क्षमताविस्तार, येरवडा येथील बिंदुमाधव ठाकरे चौकातही उड्डाणपूल व समतल विलगक प्रस्तावित आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील समतल विलगक, पुणे ग्रँड टूर २०२६ या जागतिक सायकल स्पर्धेसाठीचे रस्ते, कमला नेहरू रुग्णालयाचे आधुनिकीकरण, पुणे महापालिकेचा ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम (पहिला टप्पा), महानगरपालिकेच्या विविध इमारतींवरील सौर प्रकल्प, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील नवे सर्पोद्यान व इतर उपक्रम आणि शहराच्या विविध भागातील नवे रस्ते, पदपथ यांचे भूमिपूजनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्‍ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com