अभिजात स्वरांनी ‘सवाई’ची भैरवी अखेरच्या दिवशी उच्चांकी गर्दी; वैभवशाली वर्तमानासह आश्वासक भविष्याचे दर्शन
पुणे, ता. १४ ः पं. उपेंद्र भट, श्रुती विश्वकर्मा-मराठे, सावनी शेंडे यांचे सुश्राव्य गायन आणि डॉ. एल शंकर यांचे आगळेवेगळे व्हायोलिन वादन, अशा अभिजात सादरीकरणांनी रविवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. पं. व्यंकटेश कुमार आणि अनिरुद्ध ऐताळ यांच्या खिळवून ठेवणाऱ्या स्वराविष्काराने अभिजात शास्त्रीय संगीताच्या वैभवशाली वर्तमानासह आश्वासक भविष्याचे दर्शन घडले. ‘अर्घ्य’ या सहगायनाने महोत्सवाचा कळसाध्याय गाठला. परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या ध्वनीफितीने स्वरयज्ञाची भैरवी झाली.
महोत्सवाचा अखेरचा दिवस उच्चांकी गर्दीत पार पडला. रविवारच्या सत्राची सुरवात पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. राग कोमल रिषभ आसावरीमधील ‘सबही मेरा होत’ आणि ‘मै तो तुमरो दासी’ या रचनेनंतर हिंडोलबहार रागातील ‘कोयलिया बोले चली जात’ ही बंदिश त्यांनी प्रस्तुत केली. ‘समचरण तुझे देखिले’ हा अभंग आणि ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ ही भक्तिरचना सादर करत त्यांनी सांगता केली. त्यांना संवादिनीवर निरंजन लेले, तबल्यावर सचिन पावगी, व्हायोलिनवर रमाकांत परांजपे, पखवाजवर गणेश चाकणकर, टाळासाठी माऊली टाकळकर आणि तानपुऱ्यावर विनायक हेगडे, धनंजय भाटे यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात श्रुती विश्वकर्मा-मराठे यांनी राग पटदीपमधील ‘नैया मोरी पार’ आणि ‘जागे मोरे भाग महाराज’ या बंदिशी प्रस्तुत केल्या. या दोन्ही बंदिशी श्रुती यांच्याच होत्या. द्रुत एकलातील तराण्यानंतर ‘निर्भय निर्गुण’ या निर्गुणी भजनाने त्यांनी समारोप केला. त्यांना संवादिनीवर लीलाधर चक्रदेव, तबल्यावर प्रणव गुरव आणि तानपुऱ्यावर आदिश्री पोटे व तेजल कुलकर्णी यांनी साथसंगत केली.
चौथ्या सत्रात सावनी शेंडे यांनी राग मारवा प्रस्तुत केला. विलंबित एकतालातील ‘गुरुनाम का सुमिरन करिए’ आणि ‘सप्तसूरन मे परमेश्वररूप’ ही मध्यलय त्रितालातील बंदिश त्यांनी सादर केली. पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांची ‘हो गुनियन मिल गावो बजावो’ ही बंदिश आणि मिश्र मारुबिहाग रागातील ‘मतवाले बलमा’ हा दादरा पेश केल्यानंतर ‘राम गावा राम घ्यावा’ या समर्थ रामदास स्वामींच्या अभंगाने त्यांनी विराम दिला. त्यांना तबल्यावर रोहित मुजुमदार, संवादिनीवर राहुल गोळे आणि प्रीती पंढरपूरकर-जोशी व श्रुती वैद्य यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
पाचव्या सत्रात डॉ. एल. शंकर यांचे आगळेवेगळे डबल व्हायोलिन वादन सादर केले. ‘‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होणे, हा आनंदाचा भाग आहे. हा भारतातील सर्वात मोठा संगीत महोत्सव आहे आणि यामध्ये सहभागी होण्याची संधी, माझ्यासाठी सन्मानजनक आहे.’’ अशा शब्दांत डॉ. एल. शंकर यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांनी दाक्षिणात्य संगीतातील हरीकांबोजी या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग झिंझोटीशी साम्य असणाऱ्या रागाची मांडणी केली. रागम्, तालम्, पल्लवी या क्रमाने त्यांनी सादरीकरण केले. सव्वानऊ मात्रांमध्ये केलेले हे वादन झाल्यावर त्यांनी राग ‘गौरी मनोहारी’मधील रचना पेश करून विराम घेतला. एल. शंकर यांना अमित कवठेकर यांनी पूरक तबलासाथ केली. आनंद देशमुख यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
----
पं. व्यंकटेश कुमार यांची संस्मरणीय मैफील
रविवारच्या सहाव्या सत्रात ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार यांनी राग पुरियाच्या साथीने संस्मरणीय मैफील रंगवली. त्यांच्या मैफिलीनंतर रसिकांचा टाळ्यांचा कडकडाट स्वरमंडपात कितीतरी वेळ निनादत होता.
राग पुरियामध्ये त्यांनी विलंबित एकतालातील ‘फूलन की हरवा’ ही रचना आणि ‘गजरे बनकर आई’ ही द्रुत त्रितालातील बंदिशी सादर केली. त्यानंतर राग केदार मधील ‘झनकार परी’ ही रचना, तसेच ‘कान्हा रे नंदनंदन’ही बंदिश, रामदासी मल्हार रागातील ‘बादरवा गहर आये’ ही रचना पेश केली. रसिकांच्या आग्रहास्तव तीन भक्तिरचना सादर करून त्यांनी प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तानपुऱ्यावर शिवराज पाटील व नागनाथ नागेश यांनी साथ केली.
----
‘टाळ’साधकाचा सन्मान
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांना रविवारी महोत्सवात प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने मागील आठ दशकांहून अधिक काळ कलाकारांच्या चार
पिढ्यांना टाळसंगत करणाऱ्या या ज्येष्ठ आणि लवकरच शंभरी पूर्ण करणाऱ्या ‘टाळ’ साधकाचा सन्मान झाला. रोख रुपये ५१ हजार व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, मिलिंद देशपांडे, डॉ. प्रभाकर देशपांडे आणि आनंद भाटे आदी उपस्थित होते.
----
स्वरभास्कराला सुरांचे ‘अर्घ्य’
पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी या शिष्यांनी ‘अर्घ्य’ या एकत्रित सादरीकरणातून स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना सुरांचे अर्घ्य अर्पण करून आदरांजली वाहिली. याच सहगायनाने ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता दरवर्षी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होत असे. त्यांचे निधन झाल्यानंतर गतवर्षीच्या महोत्सवात डॉ. अत्रे यांच्या चार शिष्यांनी गायनातून स्वरांजली अर्पण केली होती. तर यंदा किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब, त्यांचे शिष्य सवाई गंधर्व आणि त्यांचे शिष्य पं. भीमसेन जोशी या गुरुपरंपरेला अभिवादन म्हणून ‘अर्घ्य’ सादरीकरण झाले.
यावेळी पं. उपेंद्र भट यांनी ‘धन धन भाग सुहाग तेरो’ ही बंदिश, श्रीनिवास जोशी यांनी ‘पिया बिन नहीं आवत चैन’ ही ठुमरी, आनंद भाटे यांनी ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ हा अभंग आणि विराज जोशी यांनी ‘आता कोठे धावे मन’ हा अभंग सादर केला. ‘जो भजे हरि को सदा’ या भैरवीने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे, तबल्यावर भरत कामत, टाळासाठी माऊली टाकळकर आणि तानपुऱ्यावर वैशाली कुबेर, अनुजा भावे -क्षीरसागर, संदीप जाधव व धनंजय भाटे यांनी साथसंगत केली.
फोटो ः 76577, 76576, 76575, 76561, 76560, 76559
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
