‘पिफ’ रंगणार १५ ते २२ जानेवारीदरम्यान

‘पिफ’ रंगणार १५ ते २२ जानेवारीदरम्यान

Published on

पुणे, ता. १६ ः पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या वतीने आयोजित २४वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२६ (पिफ) यंदा १५ ते २२ जानेवारी या कालावधीत होणार आहे. महोत्सवाची यंदाची संकल्पना ‘महान दिग्दर्शक, अभिनेते-चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्मशताब्दी’ अशी असून, महोत्सवात विविध विभागांमध्ये सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत.
‘पिफ’चे संचालक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याप्रसंगी पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे, अदिती अक्कलकोटकर उपस्थित होते.
सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल येथील पीव्हीआरच्या सहा स्क्रीन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर येथील तीन स्क्रीन्स आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची एक स्क्रीन, अशा १० स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली असून प्रत्यक्ष स्थळावरील नोंदणी पाच जानेवारीपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत करता येणार आहे. यासाठीचे शुल्क ८०० रुपये आहे.
‘पिफ’ची सुरुवात ‘ला ग्राझिया’ या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार असून, महोत्सवाचा शेवट ‘फादर मदर सिस्टर ब्रदर’ या जीम जारमुश दिग्दर्शित चित्रपटाने होणार आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात १०३ देशांमधील ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ हा दहा लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.

१५ जानेवारीला महापालिका निवडणुकांचे मतदान असले तरी ‘पिफ’वर याचा परिणाम होणार आहे. याउलट सुजाण नागरिक सकाळी लवकर मतदान करून सायंकाळी महोत्सवाच्या उद्‍घाटनाला येतील, अशी आम्ही अपेक्षा करतो.
- डॉ. जब्बार पटेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com