राजकीय पक्ष, उमेदवारांना कडक इशारा
पुणे, ता. १६ ः महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरात राजकीय जाहिरातबाजी करणारे फलक लावण्याबरोबरच मतदारांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. संबंधित फलक किंवा कार्यक्रमांसाठी कुठलीही परवानगी महापालिकेकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, त्यावरील खर्च संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये ग्राह्य धरला जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सोमवारपासून महापालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर मंगळवारपासून महापालिकेकडून राजकीय व्यक्तींच्या नावांचे फलक, छायाचित्र झाकण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही इच्छुक उमेदवारांकडून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संबंधित कार्यक्रम, स्वतःची छायाचित्रे, निवडणुकीसंबंधीचा मजकूर असणारे फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. याबरोबरच इच्छुक उमेदवारांकडून विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमातील विजेत्यांसह कार्यक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्यांनादेखील भेटवस्तू दिल्या जात आहेत. साड्या, भांडी यासह विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू देऊन मतदारांना आकर्षित केले जात आहे.
दरम्यान, इच्छुक उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून जाहिरातफलक, कार्यक्रमांसाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांच्याकडून सर्रासपणे आचारसंहितेचे उल्लंघन केले जात आहे. मात्र, अद्यापही त्यांच्यावर महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. त्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘जाहिरात फलक, कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच त्यासाठीचा खर्च हा त्या-त्या राजकीय पक्षाच्या खर्चामध्ये दाखविला जाईल.’’
महापालिका निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे, मात्र आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील.
- प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका

